बीबी का मकबऱ्यातही रोषणाई करण्याचा निर्णय; जी- २० समूह देशातील प्रतिनिधीच्या दौऱ्यापूर्वीच लगबग वाढली
सुहास सरदेशमुख
औरंगाबाद : वेरुळ लेणीच्या अंधाऱ्या जागा आता मंद प्रकाशझोतानी उजळून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेणींमधील गर्भगृह, काही अंधारलेले कोपरे शोधून काढण्यात आले असून वेरुळ लेणी क्रमांक २९, १०, ५ आणि १६ म्हणजे कैलाश लेणींमध्ये ‘एलईडी’ प्रकाश योजना योजली जाणार आहे. हे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून केले जाणार आहे. तर भारतीय पर्यटन विकास मंडळाच्या वतीने बीबी का मकबरा येथील २५ एकर परिसरातही नव्या प्रकारे नवी रोषणाई केली जाणार आहे. ही पूर्वी प्रस्तावित केलेली कामे आता जी-२० समूह देशातील प्रतिनिधी पर्यटन स्थळी भेट देण्यास येणार असल्याने वेगाने हाती घेतली जाणार आहे.
वेरुळकडे जाणाऱ्या रस्त्याचे नव्याने १५ सेंमी थराचे नव्याने डांबरीकरण हाती घेतले जाणार आहे. त्याच बरोबर वाहनतळ विस्तार आणि आवश्यता भासेल तिथे दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. मात्र, वेरुळ लेणीमधील काही अंधाऱ्या जागांचा शोध आता घेण्यात आलेला आहे. याशिवाय तीन स्वच्छतागृहही उभारली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील बीबी – का- मकबरा येथील बंद पडलेले कारंजेही येत्या काही दिवसात सुरू केले जाणार आहे. मात्र, येत्या काही दिवसात २५ एकर परिसरात मोगल गार्डन आहे. ही बाग सहा समभागात विभागलेली असते. त्यातील प्रत्येक भागात नवी प्रकाश योजना हाती घेतली जाणार आहे. हे काम भारतीय पर्यटन विभागाकडून करण्याची तयारी असल्याचे पत्र भारतीय पुरातत्त्व विभागाला प्राप्त झाले असून देशभरातील पाच पर्यटनस्थळांना नवी झळाळी देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर झाला असून त्यात औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबऱ्याचाही समावेश आहे.
एकच ई- तिकिटाची सोय
देशभरातील ५६ पर्यटनस्थळांवरील तिकिटांसाठी आंतरजाल व्यवस्था निर्माण करण्यासाठी फायबर ऑप्टीकची व्यवस्था केली जात असून अजिंठा येथे ही व्यवस्था पोहोचली आहे. अजिंठा तिकिटांसाठी एकाच खिडकीतून वेरुळ- अजिंठा अभ्यागत केंद्र तसेच बसची तिकिटे वेगवेगळय़ा ‘क्युआर’ कोडच्या आधारे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासही भारतीय पुरातत्त्व विभाग तयार असल्याचे आता सांगण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी यास विरोध केला जात होता. पण आता तिकिटाच्या कार्यप्रणालीत सुटसुटीतपणा आणला जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून एकाच तिकिटासाठी आग्रह धरला जात होता. आता ही सोयही लवकरच हाती घेतली जाणार आहे.
‘‘येत्या काही दिवसात वेरुळ लेणीमधील अंधाऱ्या बाजू उजळणार आहेतच. बीबी-का-मकबऱ्यातील काही काम पूर्ण झाले आहे. पण केवळ मकबऱ्यातील वास्तूवर भारतीय पुरातत्त्व विभाग काम करत आहे. उर्वरित परिसरही प्रकाशमान व्हावा आणि पर्यटन वाढावे यासाठी आता भारतीय पर्यटन महामंडळाने पुढाकार घेतला आहे. जी-२० समूह देशातील प्रतिनिधी येणार आहेत म्हणून खास असे काही केले जाणार नाही. पण काही सुधारणा नक्की हाती घेण्यात आल्या आहेत.
मिनलकुमार चावले, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व विभाग