जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेणारी मंदाताई एकनाथ खडसे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीप मारणे यांनी बुधवारी फेटाळली.
जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आणि दुसर्या तालुक्यातील रहिवासी असल्याच्या कारणावरून त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेणारा अर्ज मंदाताई खडसे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. मात्र, खडसे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. त्यामुळे मंदाताई खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जाविरोधात याचिका दाखल केली होती. सहकारी निवडणुकीचे बदलेल्या नियमानुसार कोठूनही कोणीही अर्ज भरू शकतो, असा मुद्दा खंडपीठापुढे मांडण्यात आला. त्याआधारे खंडपीठाने मंदाताई खडसे यांची याचिका फेटाळली. सरकारकडून ॲड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले.