छत्रपती संभाजीनगर : कापसाच्या बियाणांच्या दरात या वर्षी प्रति पाकीट ३७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राज्यात साधारणत: पावणे दोन कोटी पाकिटांची आवश्यकता असते. पाकिटांच्या कंपनीनिहाय उपलब्धतेबाबतचे तपशील अद्याप कृषी विभागाने गोळा केले नसले तरी बियाणे आणि काही खतांच्या किंमतीमध्ये सरासरी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. कापूस बियाणांचे एक पाकीट ४७५ ग्रामचे असते. बीटी -२ श्रेणीतील बियाणांच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षी ११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांत कापूस बियाणाच्या एका पाकिटामध्ये २७१ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. २०२० मध्ये कापूस बियांणाचा दर ७३० रुपये एवढा होता.

केवळ बियाणांचे दर वाढले नाही तर डीएपी वगळता अन्य सर्व खतांच्या किंमतीमध्ये ३०० रुपयांची वाढ झाली आहे. डीएपी खताचा दर गेल्या पाच वर्षांपासून १ हजार ३५० एवढाच स्थिर राहिला आहे. राज्यात खरीप तयारीचा भाग म्हणून बियाणे व खतांची मागणी आणि त्याचे दर यावर कृषी विभागात चर्चा सुरू आहे. २०२० मध्ये कापूस पाकिट ६३० रुपयांना मिळायचे, ते पुढे ३७ रुपयांची भर पडली. ७६७, ८१०, ८५३, ८६४ रुपये आणि आता कापूस पाकिटाचा दर ९०१ रुपये झाला आहे. कापसाचे उत्पादन आणि दर याचे गणित घालून काही भागात लागवड कमी हाेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी अधीक्षक डॉ. प्रकाश पाटील म्हणाले, ४७५ ग्रामच्या कापूस पाकिटाचे दर आता ९०१ रुपयांनी वाढले आहेत.’ दर वाढल्याने बियाणे उलाढालीवर त्याचे परिणाम दिसून येतील, असे सांगण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी वाढीच्या तुलनेत या वर्षी ३७ रुपयांची भर त्यात पडली आहे.

१०: २६: २६ या खताचा २०२४ मधील दर १ हजार ४७० रुपये होता तो आता १७२५ रुपये झाला आहे. यात २५५ रुपयांची वाढ झाली आहे. १२ : ३२ : २६ या खताच्या किंमतीमध्ये २५० रुपयांची भर पडली असून, अन्य खतांच्या दरामध्येही वाढ झाली आहे.