सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : घरासमोर प्लास्टिकच्या दोन-तीन टाक्या मांडून ठेवलेल्या, ठरावीक अंतराने फिरणारे टँकर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत दिसतात. बहुतेक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती. तलाव आटलेले, विहिरी कोरड्या पडलेल्या. शुष्क प्रदेशात पारा ४० अंशापेक्षा जास्त असताना निवडणूक प्रचाराचा तसा मागमूसही सापडत नाही. कारण निवडणुकीपेक्षाही पाणी टंचाईशी दोन हात करण्यालाच स्थानिकांचा प्राधान्यक्रम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जालना जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तलावात पाणीसाठाच शिल्लक नाही. भोकरदन परिसरातील राजूर परिसरातील दहा किलोमीटरच्या परिघातील साऱ्या विहिरी कोरड्या पडलेल्या. त्यामुळे सारे जगणे टॅँकरच्या भरवशावरचे. सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना जालन्यातील काही भागांत मात्र निवडणुकीचा प्रचार फारसा दिसत नाही. काही गावांमध्ये विजेच्या खांबांना बांधलेले भगवे आणि निळे झेंडे एवढेच काही ते निवडणुकीचे रंग. निवडणुकीवर कोणी बोलत नाही. कोणी नेता गावात आलाच तर तेवढ्यापुरते लोक गोळा होतात. मग पुन्हा लोक वाट पाहत राहतात टँकरची. ‘दिवसभरातील तीन ते चार तास पाणी आणण्यात जातात,’ अशी प्रतिक्रिया जालना गावातील आम्रपाली बोर्डे यांनी दिली.

हेही वाचा >>>बीडमध्ये पंकजा मुंडे, जरांगे पाटील एका मंचावर

मराठवाड्यातील अनेक गावांना टँकरद्वारेच पाणीपुरवठा होतो. सोमिनाथ राठोड तीन-चार वर्षांपासून टँकरचे चालक म्हणून काम करतात. राजूरपासून पाच किलोमीटर बाणेगाव येथे त्यांचे टॅँकर थांबलेले. त्यांच्याबरोबर सुधाकर ठोंबरे, सय्यद हबीब ही मंडळीही टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी थांबलेली. टँकरचालकांचा भर दुपारी गप्पांचा फड जमतो. पण त्यातही राजकारण तसे नसतेच. ‘‘आमचे सगळे आयुष्य विजेवरचे. म्हणजे जेव्हा वीज असेल तेव्हा टँकरमध्ये पाणी भरायचे. ज्या गावातून पाणी संपते, तेव्हा फोन सुरू होतात. त्यामुळे कधी चार वाजता उठतो, पळतो तर कधी भर दुपारी पळावे लागते,’’ असे सोमिनाथ म्हणाला. सोमिनाथचा पगार १७ हजार रुपये. गाडीमध्ये काही बिघाड झाला नाही. टायर पंक्चर झाले नाही तर दोन किंवा तीन फेऱ्या एका गावात होतात. ते पाणी मोटारीने टाकायचे. आता विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे बाणेगावातील गावातून एक किलोमीटरवरून पाईपने टँकर भरण्याची सोय केलेली. एक टँकर भरायला तासभराचा वेळ. पुढे तो रिकामा करायचा आणि नव्याने ‘पॉईंट’पर्यंत जायचे, असेही त्यांनी सांगितले.

‘सरकारचे शेतीकडे पुरेसे लक्ष नाही’

आता प्रत्येक गावातील छोट्या हॉटेलचालकांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पाच हजार लिटरचा टँकर १ हजार २०० रुपयांना. प्रत्येक गावात पाणीबाजार तेजीत आहे. पण आता टंचाई हाँ मुद्दा अंगवळणी पडला आहे. लोक चिडत नाहीत, ओरडत नाहीत. वाट पाहत राहतात टँकरची. जानेवारी महिन्यात जसे टँकर सुरू झाले तसे बियाणांच्या दुकानात शुकशुकाट जाणवू लागला. त्याला आता चार महिने झाले आहेत. राजूरमधील विक्रेते म्हणाले, ‘आमचा भाग तसा भाजपचा आहे. फार तक्रार नाही आमची. या सरकारने शेतीकडे पुरेसे लक्ष दिले नाही. भावच नाही मिळाले शेती पिकांना. त्यामुळे सारे काही आक्रसले आहे.’

टँकरची स्थिती

●बीड, धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये तर टँकर वाढत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ५६९ आहेत.

●आता पाण्याचा स्राोत आणि एका गावातून दुसऱ्या गावात पाणी नेण्याचे अंतर वाढू लागले आहे. जालना जिल्ह्यात ४०७ टँकर लावण्यात आलेले आहेत.

●नांदेड, हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र अतिवृष्टीमुळे पिके गेली. आता टंचाई परमोच्च पातळीवर आहे. पण नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There is no trace of campaigning in the drought stricken region of marathwada amy
Show comments