छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशी अल्पवयीन मुलीची खरेदी करून तिच्याकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणाऱ्या पती-पत्नीसह तिघांना हर्सूल पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान त्या अल्पवयीन मुलीला पुण्याच्या राणी व तिच्या पतीने विक्री केल्याचे समोर आले असून त्यांच्या शोधसाठी दोन पोलीस अधिकारी व चार पोलिसांचे एक पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. सासवडमधून आयुर्वेद डॉक्टर व पुण्यातून एका महिलेला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> “मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
सईद मेहताब शहा उर्फ शेख (४२), समीना सईद शहा उर्फ शेख (३४), वाजीद इलियास शेख (३७, सर्व रा. कोळेवाडी, हर्सूल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलीचे वय १६ वर्षे असून ती ढाका जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. तर राणी ही देखील बांगलादेशी तर तिचा पती कोलकाता येथे राहणारा आहे. तो डॉक्टर असल्याचे राणी सांगत होती. १७ जानेवारी २०२४ रोजी बसने छत्रपती संभाजीनगरात आणले व समीना नोकरीला लावेल, असे सांगून राणी व तिचा पती निघून गेले. येथे बळेच आणि धमकावून देहविक्रय करवून घेत असल्यामुळे समाजमाध्यमावरून आपल्या वडिलांशी संपर्क केला. वडिलांनी बांगलादेशातील पोलिसांशी संपर्क साधून पीडितेचे बोलणे करून दिले. त्यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्तालय गाठत घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, वरील तिन्ही आरोपींना २९ जानेवारीपर्यंत पाेलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी दिले. दरम्यान, याप्रकरणात मंगळवारी सायंकाळी पुण्यातून आशा शेख व आरोपी राणीचा पती डॉ. प्रशांत प्रतुश रॉय (वय ३६) या दोघांना ताब्यात घेतले आहे. राणी पसार असून डाॅ. प्रशांत रॉय हा सासवडमध्ये मूळव्याधीवर उपचार करत असल्याचे समोर आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.