छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील तिहेरी लढ्यातील बहुरंगी प्रचारात विजयाचे सूत्र जातीच्या समीकरणात दडले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचारात ‘ खान की बाण’ नव्हता. पण मतदानाच्या पारूपात तो होताच. एकगठ्ठा मुस्लीम मते ‘ एमआयएम’ च्या पारड्यात पडतील अशी भीती दाखवून महायुतीने प्रचाररंग बदलला. नव्या प्रारूपात शिवसेनेने बदलेल्या भूमिकेमुळे ‘मुस्लीम मतां’मध्ये फूट पडेल का, या प्रश्नाभोवती उमेदवारांच्या विजयाचे अंदाज बांधले जात आहेत. मतदान झाल्यानंतर फटाके फोडून आणि ढोल वाजवून विजयापूर्वीच ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला. पण निकालापूर्वीचा हा जल्लोष कदाचित ‘चूक’ ठरेल, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जात आणि धर्म या मुद्दयांभोवती रंगलेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर फार तर दहा हजार असेल, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मतांच्या ध्रुवीकरणावर निकाल अवलंबून

काहीशा उशिराने महायुतीचे उमेदवार म्हणून संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर झाली. संजय शिरसाठ, प्रदीप जैस्वाल, रमेश बोरनारे या शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांबरोबर भाजपचे प्रशांत बंब, अतुल सावे यांनी महायुतीच्या उमेदवाराला मते मिळावीत म्हणून केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहेत का, यावर संदीपान भुमरे यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. ग्रामीण भागात जातीय अंगाने प्रचार झाला असला तरी शहरातील काही भागात ‘मोदी’ ना प्रधानमंत्री करण्यासाठी मतदान झाले. भुमरे यांची ‘मद्या विक्रेता’ अशी उद्धव ठाकरे गटाने केलेल्या प्रतिमेचा शहरी मतदारांवर फारसा परिणाम झाला का हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र, ग्रामीण भागात भुमरे यांच्या प्रतिमेचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे. ‘खान की बाण’ प्रचारातून गायब होते, तसेच राजकीय पटलावर ‘मराठा – ओबीसी’ हा प्रचारही नव्हता. पण मतदानाचे निकष मात्र, त्याच अंगाने फिरविण्यात उमेदवारांना यश आले. मराठवाड्यातील अन्य मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मतदारांनी ‘मोदी’ विरोधात मत करायचे हे ठरवले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांचा रोख ‘एमआयएम’ पासून दूर होण्याचा नव्हता, असेच सांगण्यात येत आहे. पण या वेळी एमआयएम पक्षाला दलितांचे सरसकट मतदान मिळाले नाही. त्यामुळे निवडणुकीतला विजयाचा ‘एक्स फॅक्टर’ त्रिकोणी असू शकेल. अटीतटीची खेळ या शब्दाचा अर्थ समजावून घेताना कर्जदार कंपन्या जशा स्टार काढून अटींची भलीमोठी यादी जोडतात. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीचे झाले आहे. जर असे झाले असेल तर आम्ही नाही तर ते, असे सारे जण सांगत आहेत.

Story img Loader