छत्रपती संभाजीनगर : दुचाकीसारखेच दिसते, पण आहे तीनचाकी वाहन. आसनव्यवस्था खुर्चीवर बसल्यासारखी आरामदायी. हे वाहन दीड युनिट विजेवर म्हणजे अवघे १५ रुपये खर्च येऊन तब्बल ६० किलोमीटर अंतर कापते आणि ते केवळ ६० वर्षांवरील ज्येष्ठांनाच विक्री केले जाते, असा दावा आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरवासीयांना दुचाकीसारख्या दिसणाऱ्या तीनचाकी वाहनाविषयी कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे.

सिडकोच्या अपेक्स रुग्णालयाजवळ राहणारे ज्येष्ठ नागरिक अनंत मोताळे यांच्याकडे ही तीनचाकी पाहायला मिळते. अनंत मोताळे हे राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते अन्न वाचवा समितीचे काम करतात.

नव्या प्रकारच्या शोधून काढलेल्या त्यांच्या वाहनाबाबत मोताळे यांनी सांगितले, की बसण्यासाठी आरामदायी वाहन असावे, असा विचार सुरू होता. त्याचा समाज माध्यमावरून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला. एक वाहन राजस्थानमध्ये असल्याचे दिसून आले. तेथे संपर्क केला. त्यांनी पुण्यात याची सोय करून देता येईल. तेथे जाऊन पाहावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार पुण्यात जाऊन खात्री करण्यासाठी सध्याचे वाहन पाहून आलो. पुणेकर व्यावसायिकाने छत्रपती संभाजीनगरमध्येच सोय करून दिली.

एक लाख ६० हजार रुपयांचे हे तीनचाकी वाहन विजेवर चालणारे आहे. त्यासाठी दीड युनिट वीज खर्च होते. त्यातून ६० किलोमीटरचा प्रवास होतो. अत्यंत आरामदायी असल्याने प्रवासाचा थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे हे वाहन बसूनच मागे घेता येते. वाहनाची तशी रचना आहे. त्याचा ज्येष्ठांना अधिक लाभ होतो. वाहनाला मागील खुर्चीखाली सामान ठेवण्याचीही जागा आहे.