दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला आणि पालक-विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली. यंदा जिल्ह्यात ११९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल या शाखांसाठी प्रवेश क्षमता १७ हजार ६९० आहे. या तुलनेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या तब्बल २० हजार २१४ असल्याने उर्वरित दोन हजार ५२४ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय, तंत्रनिकेतनचा पर्याय उरला आहे. अकरावीला प्रवेश घ्यायचाच असेल, तर या अडीच हजार विद्यार्थ्यांना परजिल्ह्यात प्रवेश घ्यावा लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अकरावी प्रवेशाची स्थिती उलट आहे.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तंत्रनिकेतन विद्यालये वगळता जिल्ह्यात अनुदानित व स्वयंअर्थसहायीत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ११९ आहे. महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखांच्या एकूण २२५ तुकडय़ा आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य आणि संयुक्त अभ्यासक्रमाच्या शाखा सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १२० प्रवेश क्षमता, तर उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये ८० याप्रमाणे प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यातील या ११९ महाविद्यालयांमध्ये एकूण २२५ तुकडय़ा आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम या चारही शाखांच्या एकूण २२५ तुकडय़ा असून एकूण प्रवेश क्षमता १७ हजार ९६० आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पालकांची विद्यार्थ्यांना चांगल्या महाविद्यालयात, चांगल्या शाखेला प्रवेश मिळवून देण्याची धडपड सुरू झाली आहे. परंतु जिल्ह्यात उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि त्यांच्या तुकडय़ांमध्ये घट होणे अडचणीचे होणार आहे. जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी परजिल्ह्यात धडपड करावी लागणार आहे. याचबरोबर तंत्रनिकेतन विद्यालय आणि आयटीआयमध्येही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालये डिजिटल फलकाद्वारे विद्यार्थी, पालकांना आकर्षति करीत आहेत.
गुणवत्ता व विविध शैक्षणिक सुविधा नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांतही अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रांग लावावी लागणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी आíथक लूट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रशिक्षित व गुणवंत प्राध्यापक नसल्याने त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी जिल्ह्याबाहेर अकरावीच्या विविध शाखांना प्रवेश घेण्यासाठी जातील, असा अंदाज पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
अकरावीला पर्याय शोधण्याची वेळ
दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर झाला आणि पालक-विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2016 at 01:39 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time to find options for fyjc