‘आम्हाला शहरातून मजूर आणावे लागतात. तेही दर दिवशी ५००-७००च्या संख्येने. घरातील महिलांसह जवळपास सर्वच जण वर्षांतील नऊ महिने कामात व्यस्त दिसतील. त्यामुळे भांडणतंटय़ापासून तर गाव दूर आहेच, शिवाय कर्जमाफीसारख्या योजनांमध्येही गावातील शेतकऱ्यांना फारसा रस नाही’ असे आत्माराम आणि विजय दांडगे सांगत होते. केवळ टोमॅटोच्या पिकातून गावचा एवढा उत्कर्ष साधला आहे, की जून ते डिसेंबर-जानेवारी या कालावधीत सरासरी आठ ते दहा लाखांची प्रतिदिन उलाढाल होते. तेही भाव गडगडलेले असताना. देशाच्या कानाकोपऱ्यात येथून टोमॅटो जातोच, शिवाय चार वर्षांपूर्वी पाकिस्ताननेही येथील टोमॅटोची चव चाखली आहे.. औरंगाबादपासून अवघ्या १०-१२ किमी अंतरावरील वरुड-काजी येथील आत्माराम दांडगे, विजय दांडगे गावातील उपक्रमशीलतेची माहिती सांगत होते.
सुमारे ४ हजार मतदानाच्या या गावात प्रत्येक जण कामात व्यस्त पाहायला मिळतो. रिकामटेकडय़ांची संख्या अगदीच नगण्य. गावात बहुतांश दांडगे आडनावाचे. अनेकांच्या दारात चारचाकी दिसेल. मुलीचे लग्नही करायचे तर कर्ज न काढता बक्कळ खर्च होतो, अगदी हौसेने! हा पसा टोमॅटोतून आलेला. दर गडगडलेले असोत की चढे, वरुड काजीमधील शेतकरी पीक घेणार ते टोमॅटोचेच. दर न मिळाल्यामुळे संतापून टोमॅटो फेकूनही दिले किंवा जनावरांना खायला घातले, असे होत नाही. नुकसानीच्या व्यवस्थापनाची ‘कौशल्यकुंजी’ प्रत्येकाच्या हाती आहे, अर्थात ती काहीशी मानसिकतेशीही निगडित. फायदा-तोटय़ावर बोलताना आत्माराम दांडगे सांगतात, की दर कोसळले तर आम्ही नजीकच्या एका टोमॅटोशी संबंधित कारखान्याशी संपर्क साधतो. गावातील काही तज्ज्ञ देशभरातील मोठय़ा बाजारपेठेशी संपर्क साधतात. कुठूनच आशादायक किरण मिळाला नाही तर तत्काळ दुसऱ्या पिकाची तयारी करतो. जसे सध्या गावातील अनेकांकडे कारल्याचे पीक घेतले जाते. कारल्याला सध्या ४० रुपये किलो जागेवर भाव आहे. टोमॅटोचे दर कोसळल्याचा बाऊ करून घेत नाही.
विष्णू अण्णा दांडगे यांच्या वडिलांनी येथे टोमॅटोच्या पिकाची सुरुवात केल्याचे विजय दांडगे यांनी सांगितले. त्यामुळे सर्व गाव त्यांना ‘टोमॅटो अण्णा’ याच नावाने ओळखू लागले. आज ३० ते ३५ वष्रे झाली. ग्रामस्थ केवळ टोमॅटोचे पीक घेतात. अर्धा एकर असो की आठ-दहा एकर असो, अन्य पीक तसे कमीच घेतले जाते.
गावात कोणी शेतीची विक्री करीत नाही. सहा महिने टोमॅटो तर उर्वरित महिन्यांमध्ये कारले, शेवगा, कोिथबीर, कांदा, असे पीक घेतले जाते. यातूनच गावात बहुतांश सधन लोक दिसतात. अगदी चार-सहा महिन्यांत २५ ते ४० लाख रुपये कमावणारे अनेक जण आहेत. टोमॅटोचा दर्जा राखण्यासाठी अन्यत्र कोठेही दिसणार नाही, अशी स्पर्धा आमच्याच गावात दिसेल, असे विजय दांडगे अभिमानाने सांगतात.
..तर अमेरिकेतही टोमॅटो पाठवू
देशात निर्यातबंदी उठवण्यात आली तर आम्ही अमेरिकेलाही टोमॅटो पाठवायला बसलो आहोत. चार वर्षांपूर्वी पाकिस्तानला येथूनच टोमॅटो पाठवला. आजही गावासह परिसरातील व जालना आदी भागातून टोमॅटो गावात आणून दररोज ८ ते १० ट्रक भरून दिल्ली, लखनौ, राजस्थान, सूरत, रायपूर, जयपूर, मध्य प्रदेशात येथील टोमॅटो पाठवला जातो. तेथील व्यापाऱ्यांमध्ये वरुड-काजीचा टोमॅटा हा बिनधास्त घेण्याचा माल आहे, असे आत्माराम दांडगे यांनी सांगितले.