दुष्काळसदृश्य परिस्थिीच्या पाश्र्वभूमीवर शुक्र वारी द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्य़ातील तीन गावांत पाहणी केली. बदनापूर तालुक्यातील दावलवाडी, जालना तालुक्यातील सावरगाव हडप आणि मंठा तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथे शेतकऱ्यांशी पथकाने चर्चा केली तसेच पिकांची व विहिरींची पाहणी केली. सकाळी सव्वानऊच्या सुमारास दावलवाडी येते आलेल्या या पथकाने सव्वाबाराच्या सुमारास परभणी जिल्ह्य़ाकडे प्रयाण केले.
केंद्रीय जलआयुक्त मंत्रालयाचे वरिष्ठ सहआयुक्त सतीश कामभोज, केंद्रीय अन्नधान्य महामंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक एम. एम. बोऱ्हाडे यांचा पथकात समावेश होता. जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, उपायुक्त विजयकुमार फड यांच्यासह जिल्ह्य़ातील अन्य अधिकारी या वेळी उपस्थित होते. पथकाने दावलवाडी येथील देवकाबाई गंगावणे यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली. सोयाबीन व ज्वारीच्या पिकाची संपूर्ण हानी झाल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील तूर पिकाची पाहणी करून पथकाने काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. सावरगाव (हडप) येथे रमेश आढाव या शेतकऱ्याने पथकास पिकाची माहिती दिली. रामदास चोखे, विठ्ठल भोसले, आसाराम डोंगरे, तुकाराम डोंगरे या शेतकऱ्यांशी पथकाने संवाद साधला असता त्यांनी पीक हातातून गेल्याचे सांगितले. रामजी डोंगरे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीची पाहणीही पथकाने केली. ब्रह्मनाथ तांडा येथे कापूस व तूर पिकाची पाहणी करून पथकाने विठ्ठल राठोड, सखाराम राठोड, एकनाथ राठोड या शेतकऱ्यांशी चर्चा केली. सावित्रीबाई राठोड या झोपडीत राहणाऱ्या महिलेची भेट घेऊन पीक परिस्थिती व पाणी प्रश्नाबाबत माहिती घेतली. यावेळी कृषी परिस्थिती, पाऊस, नजर अंदाजानुसार पीकनिहाय उत्पादकता, सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा इत्यादीच्या संदर्भात पथकास माहिती सादर करण्यात आली.
केंद्रीय पथकास सादर केलेल्या कृषी विभागाच्या अहवालानुसार गेल्या जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्य़ात ४५८ मि. मी. म्हणजे अपेक्षेच्या ६७ टक्के तोही अनियमित पाऊस झाला. २३ जून ते ३ ऑगस्ट दरम्यानचे दिवस पावसाशिवायचे होते. १७ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान १७ दिवसही पावसाचा खंड होता. त्याचा विपरीत परिणाम खरीप पिकांवर झाला. खरिपाची पेरणी ५ लाख ८० हजार हेक्टरवर झाली. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्य़ात ९६९ गावांतील पिकांची पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर झालेली आहे. जिल्ह्य़ातील ६ लाख ४ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये २४ हजार ४८० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा