लोकसत्ता प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील विडा येथे धुळवडीच्या दिवशी गावच्या मुलीशी विवाह केलेल्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून व नंतर सन्मानाने आहेर आदी करण्याची एक अनोखी परंपरा आहे. मागील काही दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा करोनाचे वर्ष वगळता यंदा प्रथमच खंडित झाली असून, त्याला अलिकडे घडलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणासारखी दुःखाची किनार आहे.
विडा आणि संतोष देशमुख यांचे मस्साजोग ही दोन्ही गावे केज तालुक्यातच असून, दोन्हीमध्ये अवघे पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेतील दुःखाचे सावट विडा गावावरही आहे. त्यातूनच ग्रामस्थांनी यंदा गावची परंपरा असलेल्या “जावयाची गर्दभ स्वारी”ला खंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे परंपरा
निजामकालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांनी धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडी असलेल्या विडा येथे आलेले त्यांचे जावई बाळानाथ चिंचोली (जि. लातूर) यांची थट्टामस्करीतून गाढवावर बसून सवारी काढली होती. तेव्हापासून धूलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा रूढ झाली. विडा येथील जावई शोध समिती ही जावईबापूला पकडून आणते. धुलिवंदनाच्या दिवशी ग्रामपंचायतीसमोर चपलाचा हार घातलेल्या गाढवावर बसवून मिरवणुकीला सुरुवात केली जाते. वाजत-गाजतमिरवणूक काढली जाते.
जावई बापूंना अंगठीचा आहेर
गावातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत-गाजत गर्दभ सवारी हनुमान मंदिरासमोर येते. लोकवर्गणीतून जमलेल्या पैशांतून खरेदी केलेला कपड्यांचा आहेर जावईबापूला दिला जातो. सासऱ्याच्या ऐपतीप्रमाणे सोन्याची अंगठी भेट दिली जाते. गावाची परंपरा मानून मिरवणुकीत कधीही भांडण-तंटा, मान-अपमान असा प्रकार घडलेला नाही. सर्व जाती-धर्माच्या जावयांना या गावकऱ्यांनी मिरवले आहे.
गावात दीडशेपेक्षा अधिक जावई
गावात सोयरीक झालेले दीडशेहून अधिक जावई आहेत. त्यापैकी ४० जावयांची विडेकरांनी मिरवणूक काढली आहे.