समृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवारची गुरुवारी पोलीस कोठडी संपण्यापूर्वी त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी उमरगा येथील न्यायालयात त्यास हजर करणे पोलिसांना शक्य झाले नाही. न्यायालयाने मोतेवारवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्रत्येक १२-१२ तासांचा वैद्यकीय उपचार व प्रकृतीतील सुधारणेचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
गुरुवारी मोतेवारची पोलीस कोठडी संपत असतानाच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मोतेवारला पोलीस न्यायालयात हजर करू शकले नाहीत. तशा प्रकारचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने उस्मानाबाद येथे का उपचार केले नाही, असे विचारले असता, उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात इसीजीची सोय आहे. हृदयरोगासंबंधी अधिक उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात त्याला दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने आरोपीला सोलापूर येथील शल्यचिकित्सकांच्या निगराणीखाली उपचार करावेत, असे आदेश दिले होते. मात्र, काही वेळाने मोतेवारची प्रकृती अतिशय खराब झाल्याने त्याला पुणे येथील ससूनमध्ये पुढील उपचारासाठी नेल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास पोलीस व बचावपक्षाने आणून दिले. तेव्हा न्यायालयाने पुणे येथे नेण्यास परवानगी देऊन प्रत्येक १२-१२ तासांत मोतेवारवर होणारे उपचार आणि त्याच्या प्रकृती सुधारणेचा अहवाल न्यायालयास पोलिसांनी सादर करण्याचे आदेश दिले. तसेच त्याच्या कोठडीबाबतचा निर्णय स्थगित ठेवला आहे.
ओरिसा व मध्यप्रदेश पोलिसांनी मोतेवारच्या ताब्याबाबतचे अर्ज उमरगा न्यायालयात दाखल केले आहेत. न्यायालयाने या अर्जावर नंतर निर्णय घेऊ असे म्हटले. तपास अधिकाऱ्याला सुनावणी दरम्यान आरोपीला न्यायालयासमोर हजर केल्याशिवाय निर्णय देता येत नसल्याचे उमरगा येथील दुसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एच. आर. पाटील यांनी सांगितले. सरकारी पक्षातर्फे अॅड. एस. टी. वैद्य यांनी बाजू मांडली तर बचावपक्षाने न्यायालयाचा आदेश मान्य केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Treatment in sasoon hospital on mahesh motewar