नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सेनगावात जिवाचे रान केले, तर औंढा नागनाथ येथे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी जोर लावला. परंतु दोघांनाही बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले नाही. त्यामुळे तूर्त सत्तास्थापनेचे त्यांचे मनसुबे उधळले गेले. प्राप्त स्थितीत त्यांच्यासमोर पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे.
सेनगाव व औंढा नागनाथ येथे नगरपंचायत स्थापन होऊन प्रथमच झालेल्या निवडणुकीत जणू काही विधानसभा निवडणूक आहे, या थाटात दोन्ही आमदारांनी प्रचार यंत्रणा राबविली. एवढे करूनही औंढय़ात शिवसेनेने काँग्रेसला ५ जागांवरच रोखले. सेनेलाही तितक्याच जागा मिळाल्या. मात्र, प्रतिकूल स्थितीत त्यांनी मिळविलेले यश स्पृहणीय आहे. भाजपने ४ जागा मिळवून औंढय़ात या पक्षाची ताकद कायम असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस सुरुवातीपासून हवेत होता. त्याचा फटका त्यांना बसला. या पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. एका अपक्षाने बाजी मारली. औंढय़ात भाजप कोणासोबत जाईल, यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.
भाजप जिल्हाध्यक्षपदाची निवड मंगळवारी होती. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची झालेली गर्दी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी पक्षातील गटबाजी व वाद टाळण्यासाठी अध्यक्षपदाची माळ विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या गळ्यात घातली. या निवडीचे काही परिणाम औंढा व सेनगाव नगरपंचायतच्या सत्तास्थापनेवर होण्याची चिन्हे दिसत आहेत. औंढय़ात ज्येष्ठ कार्यकत्रे पांडुरंग पाटील अध्यक्षपदाचे दावेदार होते. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयामुळे अध्यक्षपदाचे त्यांचे मनसुबे उधळले गेले. आता नगरपंचायतमध्ये सत्तास्थापनेसाठी पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अशीच काही स्थिती सेनगाव नगरपंचायतीत सत्तास्थापनेसाठी निर्माण झाली आहे. येथील त्रिशंकू हे चित्र तयार झाले आहे. येथे पंचरंगी लढत असतानाच आमदार मुटकुळे यांनी प्रचारात बहुमतासाठी सेनगावात १० दिवस तळ ठोकूनही त्यांना मतदारांनी जागा दाखवली. त्यांच्या पक्षाला मिळालेल्या ४ जागांप्रमाणे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या झोळीतही मतदारांनी तितक्याच जागा टाकल्या आणि तिन्ही पक्षाला प्रत्येकी ४ समसमान जागा मिळाल्या. येथे शिवसेना मात्र आपला जनाधार गमावून बसल्याने त्याचा फटका या पक्षाला बसला. जि.प. सदस्य ओमप्रकाश देशमुख यांनी जि.प.ला जय महाराष्ट्र करून नगरपंचायत अध्यक्षपद भूषविण्याचे स्वप्न पाहिले खरे, पण ते भंगले. देशमुख यांचा नगरपंचायतच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसकडे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यावरच निवडणुकीचा भार होता. राष्ट्रवादीकडे आमदार रामराव वडकुते, माजी खासदार शिवाजी माने, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आधार दिला, मात्र ताकद कमी पडली.
दोन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री दिलीप कांबळे, आमदार मुटकुळे यांनी मतदारांना भरभरून आश्वासने दिली, मात्र त्याचा परिणाम झाला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव यांची काँग्रेससाठी प्रचारसभा झाली. पक्ष मात्र एकजीव नव्हता. मनसेला अनुभव कमी पडला असला, तरी त्यांनी मात्र शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक म्हणजे तीनचा आकडा गाठला आणि तेच किंगमेकर ठरले.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी आता गुप्त बठका सुरू झाल्या आहेत. सेनगाव येथील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस, मनसे व शिवसेना एकत्र येणार असून, सेनगाव येथील एका मंदिरात या पक्षांच्या प्रमुख मंडळींची चर्चा होऊन कोणी किती वर्ष पद भूषवावे यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. औंढा नागनाथ येथे भाजप-शिवसेनेची युती होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. राज्यात भाजप-सेना सत्तेत असताना त्यांच्यात असलेल्या वादाप्रमाणेच औंढय़ातसुद्धा त्याचे स्वरूप पाहावयास मिळणार आहे. सेनेला ५, तर भाजपला ४ जागा मिळाल्या, मात्र अध्यक्षपदाचे कारण निमित्त करून येथे काँग्रेस व भाजपचे साटेलोटे होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नगरपंचायतींचे त्रिशंकू निकाल; सत्तास्थापनेचा आमदारांपुढे पेच
नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सेनगावात जिवाचे रान केले, तर औंढा नागनाथ येथे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी जोर लावला. परंतु दोघांनाही बहुमताचा आकडा गाठणे शक्य झाले नाही.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-01-2016 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Triangle result in nagar panchayat election