पीककर्जाची मागणी करूनही बँकेचे कर्मचारी टोलवाटोलवी करीत असल्याच्या निषेधार्थ बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
अरिवद शेषेराव रोकडे (वय २५) असे शेतकऱ्याचे नाव आहे. रोकडे यांनी चार महिन्यांपूर्वी पीककर्ज मिळावे, यासाठी स्टेट बँक ऑफ हैदराबाद रामतीर्थ शाखेकडे प्रस्ताव सादर केला. त्या वेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी जुन्या लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असून नवीन लाभार्थ्यांना नंतर कर्ज मिळेल, असे स्पष्ट केले होते. आज ना उद्या कर्ज मिळेल या आशेवर रोकडे होते. काही दिवसांपूर्वी बँकेचे शेतकी अधिकारी खासगी कामासाठी रजेवर गेल्याने त्यांचा प्रस्ताव धूळखात पडला होता.
कर्ज मिळावे, यासाठी बँकेचे उंबरठे झिजवणाऱ्या रोकडे यांनी कर्ज देण्यास बँकेचे अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत बुधवारी त्यांनी शाखा अधिकारी मोहन राजू यांच्या केबिनमध्ये प्रवेश करून जवळील पेट्रोल अंगावर ओतले. आत्ताच कर्ज द्या अन्यथा मी मृत्यूला कवटाळतो, अशी धमकी त्याने दिली. प्रसंगावधान राखत तेथे उपस्थित असलेले शेतकरी संतोष भक्तापुरे, मुरली देगलुरे, संतोष देगलुरे, पप्पू तोडे, शेख गौस, माधव घाटोळ यांनी त्याला थांबवले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी रोकडे याला दम भरण्याचा प्रयत्न केला, पण उपस्थित शेतकरी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. या प्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Story img Loader