औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडी येथील शेतकरी सत्यनारायण नाईक (वय ३०) यांना नुकसानभरपाईचे अनुदान मिळाले नाही. वारंवार फेऱ्या घालून निराश झालेल्या या शेतकऱ्याने अखेर औंढा तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसमोर विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला अडविले. पोलिसांनी समजूत काढून त्याला गावी रवाना केले.
नाईक यांना तीन एकर कोरडवाहू जमीन आहे. या वर्षी कमी पावसामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. पूर्वी गारपिटीच्या नुकसानीचे अनुदान जाहीर झाले होते. पीक नुकसानीचे अनुदान मिळण्यास तलाठय़ाकडे अनेक वेळा येरझारा मारल्या, मात्र समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. पीक नुकसानीचे अनुदान आल्याची खात्री त्याने करून घेतली होती. मात्र, तलाठय़ाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत गेली. एकूणच या शेतकऱ्याचा तलाठय़ाविरुद्ध रोष असल्याचे या घटनेतून दिसून येत होते.
शेतातील नापिकीमुळे व सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे निराश झालेल्या नाईक याने सोमवारी तहसील कार्यालय गाठले व अनुदानाची रक्कम खात्यावर जमा होत नाही या विवंचनेपोटी विषारी औषधाचा डबा हातात घेऊन विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी त्याने तहसील कार्यालयात पीक नुकसानीचे अनुदान मिळावे, म्हणून लेखी अर्जही दिला होता. त्याचे हे कृत्य पाहून आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांसह लोकांनी विषारी औषधाचा डबा त्याच्या हातून घेतला. या घटनेमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडाली.
काही पोलीस कर्मचारी तहसील कार्यालयात गेले. त्यांनी या शेतकऱ्याची समजूत घातली. काही शेतकऱ्यांनी या तलाठय़ावर महसूल प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली.

Story img Loader