तिसरीही मुलगीच झाल्याने २५वर्षीय विवाहितेस सासरच्या लोकांनी मुलीला मारून टाकण्यासाठी दबाव वाढवला. परंतु पोटच्या मुलीस मारण्यापेक्षा स्वत:च विष घेऊन महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुशिक्षित व्यापारी कुटुंबातही मुलाच्या हट्टापायी जन्मलेल्या मुलीला मारून टाकण्याची प्रवृत्ती या प्रकाराने समोर आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या महिलेचा जबाब पोलिसांनी नोंदविला असून, सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शहरातील कपडय़ाचे व्यापारी असलेल्या कुटुंबातील २५वर्षीय विवाहिता रीता इंगळे या महिलेस लागोपाठ दोन मुली झाल्या. तिसऱ्यांदा मुलगा व्हावा ही सासरच्या मंडळींची अपेक्षा होती. शुक्रवारी या महिलेने तिसऱ्या मुलीला जन्म दिला. नवजात मुलगी काहीशी अपंग असल्याने सासरची मंडळी नाराज झाली. रुग्णालयातच सासरच्या मंडळींनी उघड नाराजी व्यक्त करीत महिलेला खडेबोल सुनावून निघून गेले. शनिवारी नवजात बाळाला घेऊन ही महिला घरी गेली. त्या वेळी घरच्या लोकांनी मुलीस विषारी औषध देऊन मारून टाकण्यास दबाव वाढवला, मात्र नवजात मुलीला मारून टाकण्यास महिलेने नकार दिला आणि सासरच्या दबावामुळे स्वत:च विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
विष घेतल्याचे कळल्यानंतर या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करून सासरची मंडळी पसार झाली. घटनेची माहिती शहरातच माहेर असलेल्या नातेवाइकांना मिळाल्यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयातून आपल्या मुलीस जिल्हा रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यां मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे यांनी रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिला आधार दिला. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा