गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचे सर्वाधिक चटके मराठवाडय़ाला सहन करावे लागत आहेत. या वर्षी सारा देश लातूरकरांकडे दयेने पाहात आहे. उजनीचे पाणीच काय, टँकरमुक्त लातूरसाठी केंद्राकडून पसा आणू, मात्र लातूरकरांना पाण्याचे वाईट दिवस कोणी व का आणले याचा विचार करणार की नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केला.

टाऊन हॉलच्या मदानावर आयोजित जलजागरण सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. हंसराज अहीर, ए. टी. पाटील, सुनील गायकवाड, गोपाळ शेट्टी, सुधाकर भालेराव आदी या वेळी उपस्थित होते. पाणीप्रश्नी विरोधक टीका करीत आहेत. प्रत्यक्षात सरकारची मदत जनतेपर्यंत पोहोचते की नाही याच्या पाहणीसाठी जिल्हय़ाच्या १० तालुक्यांतील ५० गावांशी भाजप खासदारांनी एकाच दिवशी संवाद साधला. जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली.

भाजपचे १२३ आमदारांनी व २३ खासदारांनी दुष्काळी तालुक्यांचा दौरा ७५ टक्के पूर्ण केला. सरकार दुष्काळाशी खंबीरपणे मुकाबला करीत आहे. लातुरात मांजरा नदीच्या पुनरुज्जीवनाचे सुरू असलेले काम, तसेच हरंगुळ येथील जलयुक्त शिवारचे काम पाहून शिक्षणाप्रमाणेच लातूर जलयुक्त पॅटर्न राज्याला देणार असल्याचे दिसते. सरकारने केंद्राकडे ४ हजार २०० कोटी रुपये मागितले व केंद्र सरकारने ३ हजार ९७५ कोटी दिले. काँग्रेसच्या काळात राज्य सरकारने किती मदत मागितली व केंद्राने ती किती दिली, याबाबत काँग्रेसवाल्यांमध्ये धाडस असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर चच्रेस यावे. आमचे चुकले तर कान धरून उठबशा काढू, असे आव्हान दानवे यांनी या वेळी दिले.

आपल्या खासदारांच्या दौऱ्यांवर पसे खर्च होत नाहीत, आम्ही रेल्वेने येतो. कार्यकर्त्यांच्या घरी जेवतो. पक्षालाही खर्च लागत नाही. आम्ही शेतकऱ्यांची पोरं असल्यामुळे आम्हाला प्रश्नांची जाणीव असल्याचे ते म्हणाले. आज मित्र कोण अन् शत्रू कोण? हे कळत नाही. मित्रही टीका करू लागले आहेत असे म्हणत शिवसेनेचा नामोल्लेख त्यांनी टाळला. जायकवाडीचे पाणी देऊ नका या मागणीसाठी नाशिकमध्ये व मराठवाडय़ात जायकवाडीचे पाणी द्या म्हणून मोर्चा अशी दुटप्पी भूमिका आमचे मित्र घेत आहेत. आम्हाला येडं समजता का, असा प्रश्नही दानवे यांनी उपस्थित केला.

पूर्वीच्या सरकारने धरणांवर ७० हजार कोटी रुपये खर्च केले. त्यातून १ टक्काही सिंचन झाले नाही. २४ टीएमसी पाणी साठवण्यासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च व ८ वर्षांचा कालावधी लागला. आपल्या सरकारने एक वर्षांत लोकसहभागातून केवळ १ हजार ३०० कोटी रुपये खर्च करून २४ टीएमसी पाणी साठवले आहे. विरोधक तोंडाला येईल ते बोलत असल्यामुळे ही तुलनात्मक आकडेवारी सांगत असल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणले.

मांजरा नदीवर लातूर तालुक्यात दोन व निलंगा मतदारसंघात दोन बंधारे एकाच वेळी बांधण्यात आले. निलंगा मतदारसंघात लातूरपेक्षा ५० मिमी पाऊस कमी झाला. लातूर तालुक्यात २ बंधाऱ्यांतील पाणी संपले. मात्र, निलंगा मतदारसंघात बंधाऱ्याचे रोज २० लाख लीटर पाणी आमची तहान भागवून लातूरला दिले जात आहे. लातूर बंधाऱ्यातील पाणी गेले कुठे, याचे उत्तर देण्याची गरज आमदार संभाजी पाटील यांनी व्यक्त केली. खासदार प्रीतम मुंडे, नाना पाटोले, संजयकाका पाटील, सुनील गायकवाड, नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी, शैलेश गोजमगुंडे यांचीही भाषणे झाली. रेल्वेने आणलेल्या कृष्णेच्या पाण्याचे पूजन या वेळी करण्यात आले.

Story img Loader