धाराशिव: कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील शिवकालीन पुरातन दागिने गहाळ झाल्याचे मंदिर समितीने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले. चक्क तुळजाभवानी देवीचा सोन्याचा एक किलो वजनाचा मुकूट गहाळ झाल्याचा अहवालही या समितीने दिला होता. हे गहाळ झालेले दागिने आणि जगदंबेच्या तिजोरीत शिल्लक असलेले दागिने खरेच पुरातन आहेत काय? किंवा त्यांचीही अदलाबदली झाली? याची तपासणी सध्या पुरातत्व विभागाच्या तज्ञ समितीकडून केली जात आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील समिती सदस्य इनकॅमेरा तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांची तपासणी करीत आहेत.
देशातील आणि राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने आणि काही पुरातन नाणी गायब झाल्याचे समोर आले होते. त्याचबरोबर अनेक मौल्यवान अलंकाराचे वजन अचानक वाढले असल्याच्या नोंदी समितीच्या तपासणीत स्पष्ट झाल्या. प्राचीन दागिन्यांचे वजन कागदोपत्री कमी असताना वजन वाढले कसे? की दागिनाच बदलला गेला आहे? अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान दागिने चोरीप्रकरणी देवीच्या महंतांसह सेवेकरी व तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकावर १९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महंत अद्यापही फरार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या डबा क्र. १ ते ७ मधील दागिन्यांची आता पुरातत्व विभागाकडून तपासणी सुरू आहे. गुरूवारी हे पथक तुळजाभवानी मंदिरात दाखल झाले आहे.
हेही वाचा : “पंतप्रधान मोदींनी आता कायम ध्यानधारणाच करावी”, नाना पटोले यांची खोचक टीका; म्हणाले, “प्रचार संपल्यानंतर…”
पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्व विभागाचे तज्ञ अधिकारी तुळजाभवानी देवीच्या मौल्यवान, दुर्मिळ अलंकारांची तपासणी करीत आहेत. विविध रजिस्टर आणि फोटो अल्बमची पाहणी करून प्रत्यक्ष दागिन्यांची तपासणी केली जाणार आहे. देवीचा सोन्याचा एक किलो वजनाचा मुकुट गहाळ असल्याचे जिल्हाधिकार्यांनी नियुक्त केलेल्या समितीने त्यांच्या अहवालात स्पष्ट केले होते. ६ डिसेंबर रोजी माध्यमांत मुकुट गहाळ झाल्याचे वृत्त प्रकाशित होताच ११ डिसेंबर रोजी सोन्याचा मुकुट सापडला असल्याचा निर्वाळा मंदिर समितीच्यावतीने देण्यात आला. हा मुकुट खरोखर पुरातन आहे काय? दागिन्यांचे मूळ वजन कमी असताना वजन वाढले कसे? पुरातन दागिने बदलून त्या ठिकाणी नवीन दागिने ठेवले आहेत काय? दागिन्यांचे प्रत्यक्षात वय किती? अशा अनेक बाबींचा तपास पुरातत्व विभागाच्या या पथकाकडून केला जात आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर जगदंबेच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणार्यांचे खरे रूप स्पष्ट होणार आहे.