छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी मंदिराचा विकासाचा परिपूर्ण आराखडा आता १८६६ कोटी रुपयांचा झाला असून, उच्चाधिकार समितीने तो प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील सुविधा, तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतानाचा १०८ फुटांचा पुतळा, घाटशिळ महामार्गाजवळील सोलापूर बायपास पट्ट्यामध्ये व हडको येथे भक्तनिवास, प्रसादालय, पुस्तकालय, भोजनालय, भाविक सुविधा केंद्र, वाहनतळ, तसेच वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृद्ध व दिव्यांगाकरिता उद्ववाहक अशा सोयी या आराखड्यात प्रस्तावित आहेत.

तीर्थक्षेत्र विकासाच्या शिखर समितीचा अध्यक्ष मुख्यमंत्री असल्याने हा प्रस्ताव त्यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याचे ‘मित्रा’ संस्थेचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. मंदिराचा आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता.

दिनांक ४ फेब्रुवारीच्या बैठकीत या आराखड्यात बदल सुचवण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या बदलांसह त्यास उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली असून आता आराखडा मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीस पाठवला आहे. मंदिर विकासाच्या कामात नव्याने भूसंपादनासाठी ३० टक्के निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तुळजापूरकडे येणाऱ्या सोलापूर, बार्शी, धाराशिव, औसा व नळदुर्गकडून येणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यांवरील प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक कमानी बसवण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचे ठरले आहे.

Story img Loader