धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ३ ऑक्टोबरपासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी देवीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी प्रारंभ झाला. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेची तयारी मंगळवारी सकाळपासूनच सुरू होती. सुवासिनी महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून देवीच्या गादीचा कापूस वेचून काढला. यावेळी आराधी मंडळाने आराधी गीत गायले. मुस्लिम समाजातील शेख कुटुंबियांनी कापूस पिंजून दिल्यानंतर निकते, कुलकर्णी कुटुंबियांनी तो नवीन कपड्याने तयार केलेल्या तीन गाद्यात भरला. इकडे देवीचे शेजघर, पलंग, खोली पलंगे कुंटुंबियांनी घासून धुवून स्वच्छ केल्यानंतर चांदीच्या पलंगावर नवारपट्ट्या बांधण्यात आल्या. त्यावर तीन गाद्या व लोड ठेवण्यात आल्यानंतर पलंगपोस टाकून बाजुला मखमली पडदे लावण्यात आले.

सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास देेवीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी तयार केले. साडेसहा वाजल्यानंतर देविजींना भाविकांचे दही, दूध पंचामृत अभिषेक करण्यात आला. देविजींची मूर्ती स्वच्छ करण्यात आली. नंतर वाघे कुटुंबियांनी दिलेली हळद (भंडारा ) देविजींना लावण्यात आली. देविजींची मूळ मुख्य मुर्ती भोपे पुजारी यांनी शेजघरात आणून चांदीच्या पलंगावर निद्रीस्त केली. यावेळी धुपारती करण्यात आली. प्रक्षाळपूजा होवून देविजींच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस आरंभ करण्यात आला. महंत, भोपे पुजारी, सेवेकरी, विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देविंजींना मंचकी निद्रा कालावधीत देविजींना सुगंधी तेल अभिषेक सकाळी व सायंकाळी घालण्यात येणार आहेत.

हेही वाचा : ‘एमआयएम’ कडून मुस्लीम मतपेढीला साद

नऊ दिवसांची देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे.