छत्रपती संभाजीनगर : तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात यंदा विक्रमी वाढ झाली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या तिजोरीत तब्बल ८० कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर राज्यासह देशभरातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने अर्पण केलेले दागदागिने आणि मौल्यवान धातूंची संख्याही लक्षवेधी ठरली आहे. मागील वर्षभरात तुळजाभवानी देवीच्या चरणी तब्बल १७ किलो सोने आणि २५६ किलो चांदी अर्पण करण्यात आली.
मागील दोन दशकांपासून तुळजाभवानी मंदिर संपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. वीस वर्षांत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. दळणवळणाच्या सुविधा आणि मंदिर परिसरात उपलब्ध असलेल्या सोयींमुळेही देशभरातील भाविकांची संख्या संपूर्ण वर्षभर वाढताना दिसून येत आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंदिराच्या तिजोरीत भाविकांनी तब्बल १७ किलो सोने २५६ किलो चांदीचे वेगवेगळे दागिने अर्पण केले. विविध मार्गाने मंदिराच्या उत्पन्नात तब्बल ८० कोटी ८१ हजार रुपयांची रोख रक्कम जमा झाली. मागील वर्षी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात ६६ कोटी रुपये जमा झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १४ कोटी रुपयांची वाढ तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर समितीच्या तिजोरीत जमा झालेली रोकड ५४ कोटी २३ लाख रुपये एवढी होती. त्यानंतरच्या आर्थिक वर्षात त्यात पुन्हा वाढ झाली. मागील वर्षी म्हणजेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात मंदिर समितीला रोख स्वरूपात तब्बल ६६ कोटी ८१ लाख रुपये मिळाले होते. यंदा त्यात पुन्हा चांगलीच वाढ झाली आहे. मागील २०२४-२५ या वर्षात तब्बल ८० कोटी ८१ लाख रुपयांचे रोख उत्पन्न मंदिर समितीच्या खजिन्यात जमा झाले आहे. दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या उत्पन्नाच्या तुलनेत यंदा तब्बल २६ कोटी रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी २० किलो सोने आणि ३५९ किलो चांदी अर्पण केली होती. त्यात यंदा घट झाली आहे. २०२३-२३ या आर्थिक वर्षात १६ किलो सोने २७० किलो चांदी अर्पण करण्यात आली. यंदा २०२४-२५ या आर्थिक वर्षात १७ किलो सोने आणि २५६ किलो चांदी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात जमा झाली. या वर्षीच्या तुलनेत यंदा तुळजाभवानी मंदिरात सोन्यात एक किलोची वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत १४ किलो चांदी कमी मिळाली आहे. तुळजाभवानी मंदीर समितीचे विविध पाच बँकांमध्ये २७४ कोटी रुपयांच्या ठेवी असून, त्यावर यंदा तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपये व्याजही मिळाले.