छत्रपती संभाजीनगर – नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून तीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जळगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील (वय ५६) व खासगी व्यक्ती भिकन मुकुंद भावे (दोघेही रा. जळगाव) हे दोघे छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकले. गुरुवारी दुपारनंतर जळगाव येथील मेहरून तलावजवळील फ्लॅट न. ३, १० लेक होम अपार्टमेंट येथे ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा – नागपूर : दारु पिऊन दुचाकीने ‘स्टंटबाजी’; दोन युवकांचा मृत्यू
तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर २०२४ या महिन्यात नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून दीपक पाटील यांनी ४ डिसेंबर रोजी तीन लाख रुपये लाचेची मागणी करून रक्कम खाजगी व्यक्ती भिकन भावे याच्यामार्फत पंच, साक्षीदारांसमक्ष ५ डिसेंबर रोजी स्वीकारली. सापळा अधिकारी अमोल धस यांच्या पथकाने रक्कम स्वीकारताना दोघांनाही पकडले. या प्रकरणी जळगाव येथील एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली.