औरंगाबाद : महानगरपालिकेच्या भूमिगत गटार योजनेच्या पाणी शुद्धीकरणाचे बंद यंत्र अचानक सुरू झाल्यामुळे प्रकल्पात एका पाठोपाठ एक उतरेल्या सातपैकी दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. एक जण बेपत्ता आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. चार जणांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास शहराजवळील ब्रीजवाडी शिवारात घडली. मृत व जखमी चिकलठाणा परिसरातील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत मनपा व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनेश जगन्नाथ दराके (वय ४०) व जनार्दन विठ्ठल साबळे (वय ५५) यांचा या घटनेत मृत्यू झाला. तर रामेश्वर गोरोबा डांबे (वय २७) हे बेपत्ता आहेत. तसेच रामकिसन रंगनाथ माने, उमेश जगन्नाथ कवडे, नवनाथ रंगनाथ कवडे व प्रकाश केरबा वाघमारे यांच्यावर स्थानिक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वाना घटनेचा मोठा धक्का बसल्याची माहिती चिकलठाणा ग्रामस्थांनी दिली.

उपरोक्त शेतकरी हे ब्रीजवाडी शिवारातील महानगरपालिकेचा शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी शेतीसाठी वापरतात. सोमवारी भूमिगत गटार योजनेच्या पाइपलाइनवरील चेंबरमध्ये मोटारी सोडून ते पाणी शेतीसाठी वापरण्यासाठी म्हणून हे शेतकरी ब्रीजवाडी शिवारात आले होते. मात्र सोमवारी प्रकल्पाच्या पाइपलाइनमधून येणारे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे यंत्र अचानक बंद पडल्यामुळे एका जागी साचत होते. पाणी का साचत आहे, हे पाहण्यासाठी एक शेतकरी चेंबरमध्ये उतरला. बराच वेळ जाऊनही तो बाहेर येत नसल्याचे पाहून दुसरा उतरला. तोही बाहेर आला नाही म्हणून तिसरा उतरला. असे एका पाठोपाठ एक करीत सात शेतकरी चेंबरमध्ये उतरले. दरम्यान शुद्धीकरण प्रकल्पाचे यंत्र अचानक सुरू झाले. त्यामुळे चेंबरमध्ये गॅस तयार झाला. त्यामुळे गुदमरून दिनेश दराके व जनार्दन साबळे यांचा मृत्यू झाला. तर रामेश्वर डांबे हे बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्याची मोहीम रात्रीपर्यंत सुरू होती. घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मनपाचे काही अधिकारी, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह अग्निशमन विभागाचे बंब, चिकलठाणा, सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस उपायुक्त राहुल खाडे आदी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या घटनेतील जखमी, मृतांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two farmers died in underground drainage of municipal corporation