छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर एका नादुरुस्त उभ्या वाहनावर दुसरे वाहन धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. मृत व जखमी हे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील आहेत. ही घटना रविवारी सकाळी खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगावजवळील पळसवाडी शिवारात घडली. घटनेनंतर अपघातग्रस्त एका वाहनाने पेट घेतला होता.
या प्रकरणी खुलताबाद पाेलीस ठाण्यात नाेंद झाली आहे. विनायक जालिंदर पाटील (वय ४३) व दादासाहेब बाजीराव देशमुख (वय ३५), अशी मृतांची नावे आहेत. तर सलीम मुलानी असे जखमीचे नाव असल्याची माहिती खुलताबाद पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार रमेश वऱ्हाडे यांनी दिली. विनायक पाटील हे शिरढोण (ता. कवठे महाकाळ) व दादासाहेब देशमुख अजनी (ता. तासगाव) येथील रहिवासी होते. तर मुलानी हे मलंगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवासी आहेत. मृत व जखमी हे लहान टेम्पोने कन्नडकडे जात होते. या दरम्यान, रस्त्यात उभ्या एका अन्य वाहनाला मागून जोराची धडक बसल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी महामार्ग पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी भेट दिली.