जिल्हा रुग्णालयास काही महिन्यांपूर्वी पुरवण्यात आलेल्या चार लाख इंजेक्शन सिरींजच्या सुया रुग्णाला इंजेक्शन देताना बंद पडत आहेत. त्यामुळे दुसऱ्यांदा इंजेक्शन टोचावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याच्या परिणामी शिल्लक दोन लाख सुयांचा वापर थांबवण्यात आला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी या सुया निकृष्ट दर्जाच्या असल्याचे पत्र आरोग्य विभागाला पाठवून दहा दिवस लोटले, तरी त्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पुरवठा झालेल्या इंजेक्शनच्या चार लाखपकी दोन लाख सुयांचा ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. रुग्ण आणि डॉक्टरांनाही या निकृष्ट सुयांचा ताप सहन करावा लागला.
आरोग्य विभागामार्फत येथील जिल्हा रुग्णालयास औषधे आणि इतर साहित्यांचा पुरवठा केला जातो. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील अॅक्युलाइफ कंपनीकडून इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरिंजच्या चार लाख सुयांचा पुरवठा करण्यात आला. ग्रामीण आरोग्य रुग्णालय व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार जवळपास दोन लाख सुया वितरित करण्यात आल्या. रुग्णांना इंजेक्शन देताना सुई टोचल्यानंतर औषध दाब देताच सुईचे टोक बंद पडत असल्याचे प्रकार घडू लागले. परिणामी एकाच रुग्णाला दोन वेळा इंजेक्शन टोचण्याची वेळ डॉक्टरांवर आली. याचा त्रास रुग्णांना आणि डॉक्टरांनाही मनस्ताप होऊ लागल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दर दिवशी शेकडो रुग्ण इंजेक्शनासाठी आल्यानंतर त्यांना इंजेक्शन देतानाही सुई बंद पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी जवळपास दोन लाख शिल्लक सुयांचा वापर थांबवला. या बाबत १२ जानेवारीला आरोग्य संचालकांना लेखी पत्राद्वारे पुरवठा केलेल्या सुया निकृष्ट असून त्याचा रुग्णांना त्रास होत असल्याचा अहवाल पाठवला. मात्र, १० दिवस लोटले तरी आरोग्य विभागाकडून या बाबत कोणतेच उत्तर आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोग्य विभागाकडून पुरवठा करण्यात आलेल्या चार लाख इंजेक्शनच्या सुयांमध्ये अनेक ठिकाणी दोष आढळल्याचे लक्षात आल्यावर १० जानेवारीलाच या खराब सुयांचा वापर थांबवण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाकडे पत्र पाठवले आहे. मात्र, त्याचे अजून उत्तर आले नसल्याचे जायभाये यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा