औरंगाबाद : लहान मुलांच्या आरोग्याबाबत चिंतेचा विळखा पडणारा घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर आणि पोलिओसाठी दिली जाणारी पेंटा ही लस दिल्यामुळे पावणेदोन महिन्याचे बाळ उस्मानाबादमधील जुनोनी गावात दगावले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना घडली. राज्याचे आरोग्यमंत्री तथा उस्मानाबादचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यात वरील दुर्घटना घडल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जुनोनी गावात सहा मुलांना लस देण्यात आली. त्यात एका दोन महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य मुलांना मात्र काहीही त्रास नाही. मात्र मृत्यू पावलेल्या बालकाच्या प्रकृती विषयी तपास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती वस्तुस्थिती शोधण्याचे काम करणार आहे.
दरम्यान लसीकरणामुळे दगावलेल्या दोन महिन्याच्या बाळाचे शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण समोर येईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. जुनोनी गावातील वैष्णवी व देविदास कदम या दांपत्याच्या पावणेदोन महिन्याच्या प्रसाद या बाळाला गुरूवारी सकाळी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोगप्रतिबंधक इंजेक्शनद्वारे पेंटा, आयपीव्ही आणि पीसीव्ही ही लस देण्यात आली तर तोंडाद्वारे ओपीव्ही आणि रोटा या लसीची मात्रा देण्यात आली.
दगावलेल्या बाळासह गावातील सहा मुलांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, प्रसादचे लसीकरण झाल्यानंतर त्याला रिअॅक्शन आली. बाळाला तात्काळ उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच बाळाचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश करायला सुरुवात केली. आरोग्य यंत्रणेने बाळाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. मृत्यू का झाला, मृत्यूचे नेमके कारण काय? हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. गावातील एकूण ६ बालकांचे लसीकरण करण्यात आले मात्र अन्य मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगितले जात आहे.
अहवालानंतर कळेल : डॉ. मिटकरी
जुनोनी येथील बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. मात्र, यासंदर्भातील समितीकडून उद्यापासूनच या प्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार आहे. पुढील दोन दिवसांत त्याचा योग्य तो अहवाल प्राप्त होईल, असे जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.