छत्रपती संभाजीनगर – सातवीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचे वर्गातील जागेवरून भांडण झाले. भांडणानंतर वर्गाबाहेर एकाने त्याच्या बाहेरच्या मित्रांना बोलावून दुसऱ्या मुलास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये जखमी झालेल्या कार्तिक गायकवाड (वय ११) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मारहाणीची घटना सहा जुलै रोजी दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयाजवळ घडली. तर मुलाचा मृत्यू १३ जुलै रोजी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेताना झाला. याप्रकरणी मृत मुलाचे वडील मनोहर गायकवाड (रा. अब्दीमंडी) यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्यासाठी हवे सरकी उत्पादनाला बळ – अजय झुनझुनवाला यांचे मत
मोलमजुरी करून गुजराण करणारे मनोहर गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीत मृत कार्तिकचे ज्याच्यासोबत भांडण होऊन मारहाण करणारा केसापुरी तांडा येथील रहिवासी त्याचा वर्गमित्र व त्याचे तीन सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच विद्यार्थ्यांच्या हित व संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांचीही चौकशी करावी, असे म्हटले आहे.