‘देवत्व देऊ नका आम्हाला, सामान्यच ठेवा. सर्वांचेच पाय मातीचे असतात,’ असे सांगत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबाद जिल्’ाातील धुंदलगाव व वध्र्यामधील आमला ही गावे ‘नाम’ संस्थेकडून दत्तक घेतल्याचे शुक्रवारी येथे सांगितले. दुष्काळ निर्मूलन, ग्रामीण विकासाबरोबरच गाव आणि शहरांमध्ये संवाद घडवून आणणार असल्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले. ‘नाम’ संस्थेचे बोधचिन्हही तयार केल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेला नागरिकांनी मदत करावी, या उद्देशाने येथील तापडिया नाटय़मंदिरात विविध स्तरातील व्यक्तींनी अक्षरश: रांगा लावून धनादेश व रोख स्वरूपाची रक्कम सुपूर्द केली. संस्थेकडून एक कोटी झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे अनासपुरे म्हणाले.
वैजापूर तालुक्यातील धुंदलगाव येथे नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी ग्रामसभा घेतली. वर्षभर विविध उपक्रम या गावात राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. जात-पात, धर्म, पक्ष या पलीकडे जाऊन गावाने विकासाचा मार्ग निवडावा. गावात दारूचा महापूर नसावा आणि गावाला पुढे जाण्याची आस असावी, या निकषावर विदर्भातील आमला व मराठवाडय़ातील धुंदलगाव ही दोन गावे निवडल्याचे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. या संस्थेकडे आतापयर्ंत ७ कोटी रुपयांचा निधी एकत्रित झाल्याचे त्यांनी सांगितले. लोकसहभागाच्या तत्त्वावर काम उभे करावयाचे असून, त्यासाठी प्रत्येकाने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या दोन गावांमध्ये विकासकामांसाठी किती वेळ लागतो, त्यातील अडचणी कोणत्या याचा अभ्यास करून संस्थेची पुढची वाटचाल ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. धुंदलगावात पाण्याचे काम उभे राहावे, या साठी गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येत्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून ‘नाम’च्या वतीने ३ कृषी सेवा केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. मराठवाडा, विदर्भ व खान्देशात ही केंद्रे असतील. तेथे शेतकऱ्यांनी त्यांची समस्या मांडावी, ती सोडविण्यास प्रयत्न केले जातील. कृषीसेवा, रोजगाराबरोबरच शिक्षण क्षेत्रातही काम उभे करण्याचा मानस नाना पाटेकर यांनी व्यक्त केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी स्वरूपाच्या शाळा उघडण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
इचलकरंजीच्या जििनग मिलमध्ये दरमहा ७ हजार ५०० रुपयांपर्यंत नोकरी उपलब्ध आहे. अशा रोजगारांच्या संधीही उपलब्ध करून देण्यावर भर राहील, असे अनासपुरे यांनी सांगितले.
‘आम्ही निमित्तमात्र’
‘‘कोणी किती मदत दिली हे महत्त्वाचे नाही. हातात घामाने भिजलेली एक नोट एका मुस्लीम मुलीने आणून दिली. ती किती रुपयांची आहे हे महत्त्वाचे नाही. मात्र, ती त्यांना द्यावीशी वाटते, हे अधिक चांगले आहे. ढग रुसले तर आपण काही करू शकत नाही. पण या काळात आपण एकमेकांसमवेत आहोत, हा संदेश महत्त्वाचा आहे,’’ असे नाना पाटेकर म्हणाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला धाऊन गेल्यानंतर सामाजिक संकेतस्थळावरून होत असलेल्या कौतुकाबाबत नाना म्हणाले, ‘खूप मोठे करू नका, देवत्व देऊ नका. आम्ही निमित्तमात्र आहोत. आता ही चळवळ मरेपर्यंत करावी लागणार आहे. आपल्या सर्वाना या यज्ञात समिधा टाकाव्या लागणार आहेत.’
‘नाम’चे प्रस्तावित उपक्रम
   -शेतकऱ्यांसाठी तीन कृषी केंद्रे
    -मुलांसाठी निवासी शाळा
    -चरखा व शिलाईसारख्या व्यवसायातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार
     -एक कोटी झाडे लावण्याचा संकल्प
‘नाम’साठी आíथक मदत करण्यासाठी औरंगाबादकरांनी थेट रांगा लावल्या. कोणी पोलीस तर कोणी ठेकेदार. सार्वजनिक बांधकाम विभागानेही मदत केली. तापडियातील कार्यक्रमात मदतीचा ओघ सुरू असतानाच छायाचित्र काढून घेण्यासाठी प्रत्येकाच्या खिशातून मोबाईल निघाले, तेव्हा दोन्ही अभिनेत्यांनी टोमणेही मारले. पण मोबाईलवरूनचे चित्रण काही थांबले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा