छत्रपती संभाजीनगर – शहराजवळील १० ते १५ किलोमीटर अंतरावरील कच्ची घाटी येथील तलावात धुळवडी दिवशी (१४ मार्च) दुपारी ३ च्या सुमारास आंघोळीसाठी उतरलेले दोन तरुण बुडाले. या संदर्भातील माहिती प्रथम चिकलठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पदमपुरा अग्निशमन विभागाला कळवले.
पोलीस व चिकलठाणा अग्निशमन विभागाच्या पथकाने बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह पाठवले. हर्षल (वय २०, पूर्ण नाव नोंद नाही) व आदित्य जाधव (वय २०), अशी या तरुणांची नावे असल्याची माहिती अग्निशामक अधिकारी कृष्णा होळंबे यांनी दिली. दोन्ही तरुणांपैकी एक जण एमजीएम परिसरातील व एक हर्सूल भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.
चिकलठाणा अग्निशमन विभागाच्या पथकामध्ये वाहनचालक अजय कोल्हे, जवान मदन ताठे, प्रवीण पचलोरे, साई बोरुडे, आनंद भारसाखले व कृष्णा भागवत यांचा समावेश होता.