सुहास सरदेशमुख, लोकसत्ता 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्रपती संभाजीनगर : ठासून भरलेला ग्रामीण बेरकीपणा, कमालीची लवचिकता, नियम काहीही असो ‘ अ‍ॅडज्येष्ट करून घ्या ना’ ही कामाची पद्धत. यामुळे पाच वेळा पैठण मतदारसंघातून निवडून आलेल्या संदीपान भुमरे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून शनिवारचा मुहूर्त अखेर सापडला. दुपारी त्यांचे नाव जाहीर झाले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांच्या मद्य परवान्यावरून समाजमाध्यमांमध्ये टिप्पणी करायला सुरुवात केली.

जालना लोकसभा मतदारसंघात भुमरे यांचा पैठण मतदारसंघ येत असतानाही केवळ शिवसेनेच्या अन्य आमदारांच्या ताकतीच्या जोरावर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

हेही वाचा >>> धाराशिव: छाननीत एक अर्ज बाद, लोकसभेच्या रिंगणात ३५ उमेदवार, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस

एखादे काम होण्यासारखे नसेल तरीही त्यासाठी आपण प्रयत्न केले होते, हे मात्र भुमरे आवर्जून दर्शवून देतात. अनेकांचे दूरध्वनी क्रमांकही तोंडपाठ आहेत. पैठण मतदारसंघात ‘मामा’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. जरांगे यांच्या आंदोलनात पहिल्या टप्प्यात भुमरेमामा असा उल्लेख वारंवार केला जात असे. रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम करताना फळबागेमध्ये किती अंतराने खड्डे घ्यावेत यावरून बरीच चर्चा झाली होती. पण हा निर्णय शेतकऱ्यांना घेऊ द्या, त्यांच्यापेक्षा तुम्हाला अधिक कळणार नाही, असे आयएएस अधिकाऱ्यांनाही ठणकावून सांगणारे भुमरे आहेत.

भुमरे यांचे भाजप नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. जरा किंवा थोडेसे या शब्दासाठी भुमरे उजुक हा शब्द वापरतात. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांना नुकतेच ‘उजुकराव’ म्हणत त्यांची टोपी उडवली होती.

कामासाठी पाठपुरावा

भुमरे यांची भाषा रांगडी.  एखादा विषय कळला नाही, तर समजून घेण्यासाठी ते अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनीही करतात. जो कोणी काम घेऊन येईल त्याच्यासाठी अगदी विरोधक असला, तरी दूरध्वनी लावायचा. ‘आपल्या जवळचे आहेत. करून टाका तेवढं त्यांचं काम’ असे म्हणायचे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav balasaheb thackeray criticized mahayuti candidate sandipan bhumre over liquor license on social media zws