छत्रपती संभाजीनगर : आदर्श घोटाळा करून ज्या अशोकराव चव्हाण यांनी शहीद जवानांचा अपमान केला असे आपण म्हणत होता, त्यांना भाजपात घेऊन राज्यसभा दिली तर तुम्हीदेखील शहीदांचा अपमानच करत आहात, असे आम्ही मानू, असे उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले. ते छत्रपती संभाजीनगर येथे जनसंवाद सभेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदुत्वाचे बोगस बी-बियाणे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचार करा आणि भाजपात या ही मोदींची गॅरंटी आहे का, असा सवाल केला. भ्रष्ट तितुका मिळवावा, भाजपा वाढवावा असे सध्या चित्र दिसत आहे. जेव्हा मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारले जात होते तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्याबरोबर ‘डील’ करत होते, असा आरोपही त्यांनी केला. आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे आहे, घर पेटवणारे नाही असे सांगत ‘ढेकर-भाकर’ भाजपात कितीही घेतले तरी त्याचा परिणाम होणार नाही. लोकांमध्ये चीड आणि संताप असून ते भाजपाला पराभूत करतील. कारण भाजप आता श्रीरामांचां नाही तर आयारामांचा पक्ष झाला आहे.

हेही वाचा >>> श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप, सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड

केंद्र सरकार महाराष्ट्रकडून वसूल करत असलेल्या कराच्या एक रुपयातून केवळ आठ पैसे राज्याच्या विकासासाठी देते. महाराष्ट्रावर त्यांचे प्रेम नाही. त्यांचे प्रेम गुजरातवर आहे. केवळ गुजरातला उद्योग पळविल्याने गुजरात विरुद्ध अन्य राज्य अशी भिंत निर्माण केली जात आहे, असेही ठाकरे म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील समांतर पाणीपुरवठ्यासाठी शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्यावर विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयाने दखल घ्यावी व त्यांना अटक करावी अशी मागणी केली. पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत यांचेही समयोचित भाषण झाले.

भारतरत्नाचा बाजार मांडला आहे

केंद्र सरकारने मते मिळविण्यासाठी आता ‘भारतरत्ना’चा बाजार मांडला आहे. ज्यांना भारतरत्न दिला आहे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आमची तक्रार नाही. पण ज्यस्डॉ. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, त्यांच्या आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या तर आम्ही तुम्हाला मानू, असे ठाकरे म्हणाले. पीकविम्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> ‘राहुल गांधींच्या पाठीत खंजीर खुपसला’, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस नेत्याची टीका

रिकाम्या खुर्च्यांवर बसण्याचे आवाहन शहरातील सिडको भागात संभाजीमहाराज क्रीडांगणात आयोजित सभास्थळी उद्धव ठाकरे पोहोचेपर्यंत एका भागातील खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यावर बसावे असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार करावे लागले. उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू होईपर्यंत नंतर गर्दी झाली. मात्र, क्रीडांगणातील सिमेंटच्या गॅलरी पूर्णत: भरलेली नव्हती.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray target narendra modi in a public rally at chhatrapati sambhajinagar zws