काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांशी संबोधन करण्यापूर्वी ‘वाचू का?’ असं मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारल होतं. त्यावरूनच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
“तुम्ही आणखी काय चोरणार माझं? माझ्या आई वडिलांचे, आई जगदंबेचे आणि जनता-जनार्दनाचे मला असलेले आशीर्वाद तर तुम्ही चोरु शकत नाही ना? तुमच्या सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणू शकता, पण माणसं आणू शकत नाही. आणलेली माणसं भाषण संपेपर्यंत खुर्चीवर बसत नाहीत,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “मग पदवीचा उपयोग काय…”, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला
“तुम्हाला विचार दुसऱ्यांचे लागतात, अगदी बोलताना सुद्धा ‘वाचू का? वाचू का?’ असं समोरच्यांना विचाराल. मात्र, निवडणुकीत जनता मतदानाला उतरेल, तेव्हा तुम्ही वाचणार नाही. कागदावर लिहलेलं अडखळत का होईना वाचू शकाल… पण जनतेशी खेळ करू नका. आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. काय दिलं आतापर्यंत? नोकऱ्या, शेतकऱ्याला हमखास भाव दिला का?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी भरसभेत अदाणींचं नाव घेत पंतप्रधानांवर केला हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?
“जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना देशाच्या राजकारणात अस्पृश्य होते, तेव्हा हिंदूहृदयसम्राटांनी भाजपाला साथ दिली. आम्ही त्यांना खांद्यावर घेऊन फिरवलं. त्यांना महाराष्ट्रात कुणीही स्वीकारत नव्हतं. मुळात शिवसेनाप्रमुखांनी भाजपाची पालखी वाहायला शिवसेनेला जन्म दिला नाही. येथील भूमिपुत्रांचं आणि देशाचं रक्षण करायला शिवसेना निर्माण केली,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.