छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.
“देशातील पदवीधार तरुणांना नोकरी मिळत नाही. दुसरीकडे पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हटलं, तर २५ हजारांचा दंड ठोठावला जातो. अशी कोणत्या महाविद्यालयाची पदवी पंतप्रधानांकडे आहे? आमच्या येथे शिक्षण घेतलेला विद्यार्थी पंतप्रधानपदी बसला आहे, याचा महाविद्यालयाला अभिमान वाटला पाहिजे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
हेही वाचा : “…तर तुम्ही मिंध्यांचं काय चाटलं”, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल!
“मी आणि जयंत पाटील बालमोहन विद्यामंदिर शाळेत शिकलो. आम्ही मंत्री झाल्यावर आमच्या शाळेला अभिमान झाला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या महाविद्यालयात शिकले, त्यांना का वाटू नये. पदवी मागितली, तर दाखवणार नाही. विचारलं तर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो, हा कोणता न्याय आहे. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी करताय की काय?,” असा टोला उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
हेही वाचा : “शिवरायांचा अपमान झाल्यावर दातखीळ बसली होती का?”, गौरव यात्रेवरून अजित पवारांचा हल्लाबोल
“जगातील सर्वात शक्तीमान हिंदू नेता पंतप्रधान झाल्यानंतर ही हिंदूना आक्रोश करावा लागतो. म्हणजे त्या नेत्याची ताकद काय कामाची. तुम्ही म्हणाला तो हिंदू, तुम्ही म्हणाल तो देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तो देशद्रोही… ही तुमची मस्ती असेल, तर तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ उभारली आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.