छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी त्यांना मारहाण करत असल्याची एक चित्रफीत गुरुवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान सादर करण्यात आली. ही चित्रफीत बाहेर प्रसारित होऊ नये. तशी ती प्रसारित झाली, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यापुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती या प्रकरणातील मुख्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी गुरुवारी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात पार पडली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या वेळी बीड येथील सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हेही उपस्थित होते. पहिल्या सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांकडून काही कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार संबंधित कागदपत्रांची जंत्रीच गुरुवारी न्यायालयासमोर सादर केली. आरोपींच्या अर्जांवर पुढील तारखेला सुनावणी होईल. वाल्मीक पसार असताना त्याची संपत्ती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये जप्त करण्यात यावी, असा एक अर्ज राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आला होता. तर गुरुवारच्या सुनावणीवेळी वाल्मीकची चल व अचल संपत्ती जप्त करावी, असा अर्ज न्यायालयाकडून देण्यात आला आहे. या संदर्भाने वाल्मीककडून खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यावरही पुढील तारखेला सुनावणी होणार आहे. सर्व आरोपींचे वर्तन न्यायालयाने मागितले आहे. लातूर कारागृहात असलेल्या आरोपीने बीड कारागृहात येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले असल्याचे ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
माझ्याविरुद्ध पुरावा नाही, निर्दोष मुक्त करावे
या खटल्याच्या संदर्भाने माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा आढळलेला नाही. या खटल्यातून निर्दोष मुक्त करावे, असा अर्ज वाल्मीककडून करण्यात आला. त्यावर न्यायालयाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणणे मागितले आहे. वाल्मीकने त्याच्या अर्जात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. आपण संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये, अवादा कंपनीला खंडणी मागण्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी नसल्याचा केविलवाणा प्रयत्न अर्जातून केल्याचे दिसत असल्याचे ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.