बिपीन देशपांडे लोकसत्ता
औरंगाबाद : राज्य फुलाचा दर्जा लाभलेले ताम्हण वृक्ष व त्याचे फूल दिसणे सध्या महाराष्ट्रातच दुर्मीळ झाले आहे. ताम्हणच्या लाकडाची तुलना सागवानाशी केली जात असून त्यामुळे या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जात असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी ताम्हणचे अस्तित्व मराठवाडय़ात व विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये धोक्यात आले आहे. तर मुंबई, कोकण, नागपूर आदी भागात ताम्हण वृक्ष बऱ्यापैकी आढळून येतो, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. दुर्मीळ होत चाललेले वृक्ष, फुलांचे संवर्धन करण्यासाठी पंजाबमधील काही विद्यापीठांनी पुढाकार घेतला असून त्यांनी त्यामध्ये ताम्हणलाही स्थान दिले आहे.
महाराष्ट्र सरकारने ताम्हणला १९९० मध्ये राज्य फुलाचा दर्जा दिलेला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत राणी रंगातील फुलांनी ताम्हणचा वृक्ष बहरलेला दिसतो. साधारण १० ते १५ फुट उंचीने वाढणाऱ्या ताम्हण वृक्षाचे लाकूड सागवानाएवढेच महत्त्वाचे मानले जाते. त्याच्या लाकडाचा वापर कोकणात होडय़ा तयार करण्यासाठी होतो. महाराष्ट्रासह आसाम, सह्याद्रीच्या रांगांमध्येही ताम्हणचे वृक्ष आढळतात.
आरोग्याच्या दृष्टीनेही ताम्हणला महत्त्वपूर्ण स्थान आहे. विशेषत: पोटाच्या विकारांवर ताम्हण गुणकारी मानले गेले आहे. त्याची पाने, साल, बिया या उपयुक्त मानल्या गेल्या आहेत. मूळव्याध, भगंदरमध्ये ताम्हणचा उपचार फायदेशीर ठरला आहे. आतडय़ांमधील चिकटपणा कमी असेल तर त्यावर ताम्हणच्या पानांचा उपयोग करून केलेला उपचार प्रभावी ठरतो. कुंठित झालेली शौच मोकळी करता येते तर अतिसाराने बेजार झालेल्या व्यक्तीला ताम्हणच्या सालीचा वापर करून दिलेल्या औषधाने दिलासा मिळतो. मलेरियाच्या तापावरही त्याचा उपयोग होतो. तर वेदनाशामक म्हणूनही ताम्हणच्या बिया उपचारासाठी वापरण्यात येत असल्याचे उदगीरच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील पर्यावरण विभागाचे प्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी सांगितले.
अलिकडेच पंजाबमधील विद्यापीठांना भेट देण्यात आली. तेथे महाराष्ट्रात १९९० मध्ये राज्य फुलाचा दर्जा लाभलेल्या ताम्हण वृक्षाचे संवर्धन होत असल्याचे निरीक्षणास आढळून आले. महाराष्ट्रातील इतरही दुर्मीळ होत जाणाऱ्या वनस्पतींचे जतन तेथे केले जात आहे. ताम्हणला इंग्रजीत लेजोस्टोमिन स्टेसीओस तर हिंदीमध्ये जरुळ म्हणतात. ताम्हण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण वृक्ष आहे. उदगीरच्या महाविद्यालयात त्याचे संवर्धन केले जात आहे.
– डॉ. जयप्रकाश पटवारी, पर्यावरण विभाग.
मराठवाडय़ात ताम्हणचे फूल, वृक्षाचा आढळ दुर्मीळ झालेला आहे. सर्पराज्ञी प्रकल्पात आपण ज्या दुर्मीळ फूल, वृक्षांचे संवर्धन करतो त्यामध्ये ताम्हणवरही लक्ष केंद्रित केले आहे. लागवड केली तरच त्याचे दर्शन घडेल. तशी गरज आहे. ताम्हण हे आपले राज्य पुष्प आहे.
– सिद्धार्थ सोनवणे, संचालक, सर्पराज्ञी प्रकल्प, तागडगाव.