छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात गेल्या एक ते दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कोकणामध्ये हवामान बिघडल्यामुळे मच्छिमारी थांबली असून मच्छिमारांना आर्थिक फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही गेल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपल्याने तिथेही भात आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाने शनिवारी रात्री मराठवाड्यातील ४७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. पावसामुळे अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण पुन्हा एकदा १०० टक्के भरले असून १८ दरवाजांतून ७३३६ क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अनेक भागांतील शेतात पाणी साचल्याने जोमात आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने काढलेले सोयाबीन, मका या पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. तसेच कापसाचा रंगही बदलू शकतो. दोन दिवसांच्या सततच्या पावसाने नुकसानीची व्याप्ती लगेच कळणार नाही. पण नुकसान दिसू लागले असल्याचे कृषी उपसंचालक तुकाराम मोटे यांनी सांगितले.
खुलताबाद तालुक्यातील कौटगाव, संजरपूरवाडी, भोकरदन तालुक्यातील वाढोना, गोद्री, परळी वैजनाथ तालुक्यातील सेलू या गावात वीज पडून जनावरे दगावली. काही ठिकाणी भिंत पडल्याने जनावरे जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
हेही वाचा >>> माजी आमदार परशुराम उपरकर ठाकरे शिवसेनेत स्वगृही परतले
चांदवड, देवळ्यात मोठे नुकसान
नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. एकट्या चांदवड तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील तर चांदवडमध्ये साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंबाचा समावेश आहे. शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. तसेच नाशिक शहरासह कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. जळगावच्या अमळनेर तालुक्यातही दोन दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भाला अवकाळीचा फटका यवतमाळ, बुलढाणा, अकोला, आणि अमरावती जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणदाण उडाली. गेल्या २४ तासांत २३.३० मिमी पावसाची नोंद झाली असून, चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना शनिवारी अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.