महाराष्ट्राचे एकेकाळी वैभव असणारे सहकार क्षेत्र काँग्रेसने गिळंकृत केले आहे. मागील १५ वर्षांत आघाडी सरकारने गमावले, ते भाजप सरकारने वर्षभरातच कमावले. विकासकामांबाबत जी आकडेवारी सांगितली आहे, ती जर चुकीची असेल तर काँग्रेसने सिद्ध करुन दाखवावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले.
भाजप सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मदानावर भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा दानवे यांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ते बोलत होते. समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार मोहन फड, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते विजय गव्हाणे, गणेश हाके, ज्ञानोबा मुंडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, गणेशराव रोकडे उपस्थित होते.
काँग्रेस राजवटीत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. देशाला भूषण असणारे महाराष्ट्रातील सहकार व रोजगार क्षेत्र काँग्रेस सरकारने बुडवले. कारखाने बुडवून विक्रीस काढले आणि पुन्हा काँग्रेसच्याच पुढाऱ्यांनी हे कारखाने विकत घेतले, असा आरोप करतानाच अतिमुर्खाच्या हातातील कारभार जनतेने संधी म्हणून भाजपच्या हातात दिला. या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असे ते म्हणाले. आठ वर्षांत पाच हजार कोटी रुपये खर्च करून काँग्रेसने २४ टीएमसी पाणी जमा केले होते. याउलट अवघ्या वर्षभरात १ हजार ४०० कोटी रुपयांतच एवढे पाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जमा केले. ही आकडेवारी चुकीची असेल तर ते काँग्रेसने सिद्ध करावे, असे आव्हान दानवे यांनी दिले.
गेल्या १५ वर्षांचा राज्याचा कृषी विकास दर उणे राहिला, यास आघाडी सरकारचे धोरण कारणीभूत आहे. जे जे महाराष्ट्रातील बाहेर गेले होते, ते वर्षभरातच आणण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. शेतकऱ्यांची एक इंच जमीन न घेता कमी खर्चात जलयुक्त शिवार अभियान राबवून नव्या बदलाचे पाऊल या सरकारने टाकले. आमच्या हाती सत्ता आली त्यावेळी साडेतीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आघाडी सरकारने सोपवले होते. या कर्जाचे ओझे आम्ही पेलत आहोत. त्याचबरोबर जनतेच्या अपेक्षाही मोठय़ा आहेत. त्या निश्चितच पूर्ण होतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला. परभणी जिल्ह्यातील भाजपच्या पराभूत उमेदवारांना जी मते मिळाली ही पुढच्या निवडणुकीतील विजयाची चाहूल आहे. येथील प्रस्थापित राजकीय वर्चस्वाला तडा देत भविष्यातील सर्व आमदार हे भाजपचे राहतील, असेही दानवे म्हणाले. जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे यांनी प्रास्ताविक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा