छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्फोट घडवून आणल्याची घटना रविवारी (दि.२०) पहाटे घडली होती. प्रारंभी ही घटना चोरट्यांनी बँक लुटण्यासाठी केलेली खटाटोप असल्याचा अंदाज वाटला. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे ६३ लाखांचे कर्ज उचलल्याप्रकरणी बँकेने गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आणि त्यासंबंधित कागदपत्रांचे पुरावे नष्ट करण्यासाठी एका माजी उपसरपंचाने काही साथीदारांच्या मदतीने पेट्रोल बाॅम्ब फेकून जाळण्याचा प्रकार केला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या घटनेतील सहा आरोपी निष्पन्न झाले असून, मुख्य सूत्रधार असलेल्या भरत शिवाजी कदम (रा. वीरगाव) याच्यासह पाच जणांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डाॅ. विनयकुमार राठोड यांनी मंगळवारी दिली.

ग्रामीण पोलीस विभागाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, कौठुळे आदींची उपस्थिती होती. डाॅ. राठोड यांनी सांगितले की, वैजापूरच्या फुलेरोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक बजरंगलाल जुसालाल ठाका (वय ३१) यांनी वरीलप्रकरणी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्वर कराळे (रा. करंजगाव), भरत शिवाजी कदम, सचिन सुभाष केरे, वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे (रा. दोघेही गवळी शिवरा), धारबा बळीराम बिराडे (अंधोरी, ता. अहमदपूर) यांना अटक करण्यात आली. तर आप्पा बालाजी बने (रा. अधोरी) पसार झालेला असून, तो बँकेतील स्फोटाच्यावेळी भाजलेला आहे, अशी माहिती डाॅ. राठोड यांनी दिली.

यातील भरत कदम हा मुख्य सूत्रधार असून, तो वीरगावचा माजी उपसरपंचही होता. तो कंत्राटदारीही करायचा. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून ६३ लाखांचे कर्ज मिळवले होते. परंतु, त्याचा बनावटपणा उघड झाल्यानंतर बँकेने त्याच्याविरुद्ध नजीकच्या पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. त्याप्रकरणी कदम याला सहा महिने कारावासही भोगावा लागलेला होता. त्याचा राग मनात धरून भरत कदम याने वरील आरोपींना एकत्र जमवून बँक लुटीचा प्रयत्न भासेल, असा एक डाव रचला. त्यासाठी त्याने सव्वा लाखात एक वाहनही खरेदी केले. हे वाहन मालेगाव येथील असून, त्या वाहनावर चिटकवण्याचे कागद लावून रंग बदलला. पाच ते सहा क्रमांक पाट्याही जवळ बाळगल्या. परंतु त्याचा हा डाव पोलीस तपासात उघड झाला, असे डाॅ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.