छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली असल्याने त्यांची ताकद स्वबळ लढविण्याची राहिलेली नाही. काँग्रेसची मतदान घेण्याची ताकद दिसत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी १२ जागा वाटून घेण्याचे सूत्र ठरवावे. हे सूत्र ठरविण्यासाठी उगाच वेळकाढूपणा करू नये. फार तर दोन आठवडयांत निर्णय घ्यावा, असे मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत मांडले.
हेही वाचा >>> दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या; उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एकत्रपणाने निवडणूक लढवायची असेल तर प्रत्येकी १२ जागांचे सूत्र ठेवावे. अन्य कोणत्याही पक्षाची स्वबळावर लढण्याची ताकद राहिलेली नाही. १२ लोकसभेच्या जागांतील कोणती जागा कोण लढवणार यावर नंतर चर्चा होऊ शकते. पण सूत्र मात्र प्रत्येकी १२ असे असावे असे ठाकूर यांनी सांगितले. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धाथे मोकळे यांची उपस्थिती होती. मोकळे म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत वंचित आघाडीची ताकद वाढली आहे. बुथरचनाही आता पूर्ण झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी वंचितच्या लाखोंच्या सभा होत आहेत. त्यामुळे १२ जागांचे सूत्र समोर मांडले आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत व्यापक चर्चा झाली आहे. १२ जागांपैकी तीन जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याचा वंचितचा मानस असून अन्य प्रवर्गातील वंचित घटकांनाही योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल, असा दावा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.