छत्रपती संभाजीनगर : लातूर येथील रेल्वे बोगी बनविण्याच्या कारखान्यातून डबे बाहेर पडण्यासाठी आता सप्टेंबर २०२५ असा कालावधी ठरविण्यात आला आहे. हे काम ‘कायनेट’ नावाच्या कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. वंदे भारतचे १,९२० रेल्वे डबे बनविण्यासाठी दोन स्थायी आणि दोन निर्माण मार्गिका बनविण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ७०५ कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक करण्यात आली आहे.

या कारखान्यासाठी ३५१ एकर जागा देण्यात आली असली, तरी पहिल्या टप्प्यात ११० एकरात काम उभे केले जाईल. त्यात १५.६ एकरावर प्रत्यक्ष कारखाना असणार आहे. डबे बनविण्यासाठी आवश्यक असणारे गोदाम, सुटे भाग जुळविण्याची जागा, चाचणीसाठीचे मार्ग, डब्यांना रंग देण्याची कामे कोठे होतील, याचे नकाशे बनवून काम सुरू केले जाईल, असे या कंपनीच्या प्रतिनिधींनी खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना सांगितले. मात्र हे काम कधी सुरू होईल आणि प्रत्यक्षात डबे कधी बनविले जातील यावर शंका घेतल्या जात आहेत. या प्रकल्पासाठी ८१७ किलोवॉटचा सौर प्रकल्प, ६.५ किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता, एक वीज उपकेंद्र, डिझेल सेट, सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशी व्यवस्था करताना अंतर्गत रुळांची लांबी ८.६ किलोमीटर आहे.