गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे बंद ठेवण्यात आलेला वेरुळ महोत्सव या वर्षी घेण्यात येणार आहे. जानेवारीत वेरुळ महोत्सव घेण्याची तयारी सुरू असून त्यासाठी पाच लाख रुपयांचा निधीही तात्पुरत्या स्वरुपात उभा करण्यात आला आहे. उर्वरित निधी उभा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळातर्फे प्रयत्न केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी पांडेय यांनी सोमवारी दिली.
गेल्या काही वर्षांपासून महोत्सव घेतला गेला नाही. मात्र, या वर्षी पर्यटनाच्या वाढीसाठी म्हणून महोत्सव सुरू करण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय बैठकीतही चर्चा झाली. या वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या या महोत्सवाची तयारी पूर्ण होईल की नाही या विषयी शंका होत्या. मात्र, ही तयारी सुरू असून हा महोत्सव होईलच, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. या महोत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद लागते. ती वेगवेगळ्या स्रोतांतून कशी उपलब्ध होईल, याची चाचपणी सुरू आहे. पर्यटन विकास मंडळाकडून तसेच काही उद्योजकांनीही या महोत्सवास पाठिंबा द्यावा, अशी बोलणी सुरू आहे.
वेरुळ येथील १६ क्रमांकाच्या लेणीच्या पुढच्या बाजूस हा महोत्सव होणार असून अशाच पद्धतीचा महोत्सव अजिंठय़ातही घेतला जावा, या साठी प्रयत्न आहे. चीनचे उपराष्ट्रपती अजिंठा लेण्याच्या पाहणीस आले होते, तेव्हादेखील या अनुषंगाने चर्चा झाली होती. वेरुळ महोत्सवासह भविष्यात अजिंठा महोत्सवही होण्याची शक्यता आहे. सन १९९४ पासून सलग सोळा वर्षे वेरूळ महोत्सव सुरू होता.

Story img Loader