सुहास सरदेशमुख, जयेश सामंत , लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्रपती संभाजीनगर, ठाणे</strong>  : छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक कोणी लढवावी हा तिढा अजूनही कायम आहे. शिवसेनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे विनोद पाटील यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरही त्यांची रात्री उशिरा बैठक झाल्याचे वृत्त आहे. मात्र, पाटील यांना उमेदवारी फारशी सोईची होणार नाही, असा युक्तिवाद भाजपच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे केला असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> रंग जल्लोष रामाचा अन् प्रणितीचा..

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, मंत्री अतुल सावे हे दोघेही मुंबई मुक्कामी असून ही जागा भाजपला मिळावी यासाठी ते भेटीगाठी घेत आहेत. मात्र, सिंधुदुर्ग, नाशिक या जागांवरून सुरू असणारा तिढा सुटल्याशिवाय पुढील राजकीय घडामोडी घडणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.  विनोद पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचे नेते विरोध करत असून, त्यांनी पूर्वी राष्ट्रवादीकडून औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, तेव्हाची मतांची आकडेवारी पुढे केली जात आहे. सन २०१४ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांना ११ हजार ८४२ मते मिळाली होती.  विनोद पाटील यांनी त्यानंतर मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. सकल हिंदू मोर्चामध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. जरांगे यांच्या आंदोलनात पहिल्या टप्प्यात ते सहभागी झाले होते.  या अनुषंगाने विनोद पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinod patil s meeting with chief minister deputy chief minister over chhatrapati sambhajinagar constituency seat zws