छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीचे पर्यावसान दगडफेक यासह पोलिसांच्या गाडय़ांची जाळपोळ करण्यापर्यत झाल्याने पोलिसांना गोळीबार व अश्रुधुराचा वापर करत जमावाला पांगवावे लागले. यामध्ये तीन जण गंभीर जखमी असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दहा पोलीस कर्मचारीही जखमी आहेत. यातील एकास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हिंसाचारात १७ गाडय़ांची जाळपोळ झाली. रात्रभर अफवा पसरविल्या जात होत्या. पोलिसांनी ४०० ते ५०० जणांवर विविध कलमांन्वये दंगलीचे गुन्हे जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल केल्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
किराडपुरा भागात रामनवमीची तयारी सुरू असताना दुचाकी स्वारास गाडीचा धक्का लागल्याने वादास सुरुवात झाली. घोषणाबाजी करत तरुणांनी मंदिराजवळील काहींना मारले. हे तरुण औषधी गोळय़ांची नशा करत होते. त्यांनी मारहाण केल्याने सिडको भागातून आलेल्या तरुणांच्या जमावाने पुन्हा हाणामारी केली. या प्रकरणातील आरोपींना समजावून त्यांना घरी पाठवत असताना जमाव वाढत गेला. त्यांनी मग मंदिराच्या भोवताली असणाऱ्या पोलीस गाडय़ांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडाचा अक्षरश: खच पडला. त्यानंतर गाडय़ा जाळण्यासाठी जमाव पुढे येत होता. त्यांनी पोलिसांच्या आठ ते दहा गाडय़ांना आग लावली. यातील काही वाहने पूर्णत: जळाली.
मंदिरासमोरील कमान जळाल्याने राम मंदिरास समाजकंटकांनी नुकसान पोहोचविल्याची अफवा शहरात पसरली. मात्र, मंदिरात समाजकंटक घुसू नयेत म्हणून तेथे जात त्यांनी मंदिरातून शांततेचे आवाहन केले. दरम्यान जमावाला शांत करण्यासाठी एका मौलवींनाही बोलावण्यात आले. त्यांनीही शांततेचे आवाहन केले. पण जमाव शांत होत नव्हता. त्यांनी पोलीस गाडय़ांना लक्ष्य केले. अखेर जमाव शांत होत नसल्याने गोळीबार करत तसेच अश्रुधुराचा वापर करत पोलिसांनी जमावाला पांगवले. यामध्ये प्लास्टीक बुलेट आणि जिवंत काडतुसांचाही समावेश करण्यात आला. हिंसाचार करण्यापूर्वी जमावाने आधी खांबावरचे दिवे फोडले. मात्र, ‘सीसीटिव्ही’ चित्रण पाहून गुन्हेगारांना शोधून काढावे तसेच पोलीस उशिरा पोहोचल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
दरम्यान ही दंगलच ‘एमआयएम’च्या वर्तनामुळे घडल्याचा आरोप सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या दंगलीत पोलीस अधिकारी व कर्मचारीही जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेचे वृत्त समजल्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे तसेच पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. औरंगाबाद शहरात दंगल घडवून आणण्याचा कट होता, असा अंदाज दोन दिवसापूर्वी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठकही बोलाविण्यात आली होती. या बैठकीस काहिसे उशिराने आलेले खासदार इम्तियाज जलील दाखल होताच कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’ चे नारे दिले.
बुलढाण्यातही दोन गटांत हाणामारी; सात जखमी
जिल्ह्यातील मोताळा येथील एका धार्मिक स्थळासमोर घोषणाबाजी करण्यात आल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत सात जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना २९ मार्च रोजी रात्री उशिरा घडली. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही गटातील सहा जणांना ताब्यात घेतले.