औरंगाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ता विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. या तरुणाची राष्ट्रपतीपदाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली. यानंतर समाज माध्यमावर या तरुणाच्या राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
विशाल नांदरकर असं राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे. तो औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील रहिवासी आहे. तो सामाजिक कामात सक्रीय असतो. मात्र, आज (२५ जून) त्याने दिल्ली गाठत राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर या तरुणाची समाज माध्यमावर चर्चा रंगली. त्याची निवडणूक अर्ज भरल्याची पावती व्हायरल झाली आहे.
विशाल नांदरकर म्हणाले, “मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. देशभरातील सर्व खासदार आणि आमदार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मला मतदान करावं, अशी मी विनंती करतो. देशातील सर्व अपक्ष खासदार, आमदारांनी मला पहिल्या पसंतीचं मत द्यावं आणि विजयी करावं.”
हेही वाचा : विश्लेषण : राष्ट्रपती पदासाठी भाजपने घोषित केलेल्या द्रौपदी मुर्मू कोण आहेत?
शिवसेनेतील बंडखोरीचा विषय देशभरात चर्चेत असतानाच औरंगाबादच्या या तरुणाचा निर्णय देखील आता लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाला देशातील अपक्ष लोकप्रतिनिधींकडून पाठिंब्याची अपेक्षा आहे. त्याने या सर्वांना मतदान करण्याची विनंती केली आहे.