Walmik Karad Beaten Up In Jail – मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले. कारागृहात राजेश वाघमोडे आणि सुधीर सोनवणे यांच्या दरम्यान, फोनसाठी वाद झाला होता. हा वाद सुरू असताना काही इतर बंदीही जमले होते. मात्र, ही घटना घडत असताना वाल्मीक कराड व सुदर्शन घुले हे दोघेही तेथे नव्हते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

वाल्मीक कराड व घुले यांना बीड कारागृह मारहाण केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. बीड कारागृहात घडलेल्या या वादाच्या घटनेनंतर काही कैद्यांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र, वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेचा समावेश नाही, असेही सुपेकर म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गिते याने मारहाण केल्याचे वृत्त सोमवारी दुपारनंतर पुढे आले. दरम्यान, बीड कारागृहात अनेक प्रकारच्या अनागोंदी असून, कराड याच्या जेवणाची खास बडदास्त ठेवली जाते, असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. कारागृहातील कैद्यांना दूरध्वनीवरून कुटुंबीय आणि वकिलांशी बोलण्याची मुभा असली तरी त्यात प्राधान्यक्रम ठरवण्यावरून हे वाद घडले आहेत, असा प्रश्नही त्यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला. कारागृह प्रशासनाने मात्र, कराड व घुले या दोघांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.