कनिष्ठ अभियंता म्हणून निवड होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला, तरी पदस्थापना देण्यास जि. प.कडून टाळाटाळ होत असल्याने अपंग अभियंत्याने ३ डिसेंबरला अपंगदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही ६ महिन्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.
जिल्ह्यातील अरणविहिरा (तालुका आष्टी) येथील अभियंता पदवीधारक असलेल्या गहिनीनाथ सिरसाट यांनी जि. प.त कनिष्ठ अभियंता या रिक्त पदासाठी २ जून २०१३ रोजी लेखी परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या समितीने ६ जूनला मुलाखत घेऊन त्यांना निवड झाल्याचे कळविले. ४२ टक्के अपंगत्व असणाऱ्या सिरसाट यांना जि. प.ने पदस्थापना दिली नाही. त्यामुळे त्यांनी जि. प.विरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या संदर्भात गेल्या ९ फेब्रुवारीला न्यायालयाने ६ महिन्यांत सिरसाट यांच्या जागेचा विचार करून निर्णय घेण्याचे आदेश दिले. या निर्णयाला ९ महिने उलटूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. न्यायालयाच्या आदेशाचाही जि. प.ने अवमान केल्याचे सिरसाट यांनी म्हटले आहे.
आधीच अपंग असणाऱ्या सिरसाट यांच्यावर आíथक संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. निवड होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला, तरीही जि. प.कडून पदस्थापना मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. प्रशासनातील सावळागोंधळ पाहता अपंगदिनी (३ डिसेंबर) जि. प. आवारात आत्मदहन करण्याचा इशारा सिरसाट यांनी दिला आहे.
अपंगदिनी आत्मदहनाचा अभियंत्याचा इशारा
कनिष्ठ अभियंता म्हणून निवड होऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला, तरी पदस्थापना देण्यास जि. प.कडून टाळाटाळ होत असल्याने अपंग अभियंत्याने ३ डिसेंबरला अपंगदिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 16-11-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Warning of suicide by engineer