लातूरच्या पाणी प्रश्नावर केंद्रीय रेल्वे मंत्रालय अतिशय जागरूक असून पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा कारभार दक्ष पद्धतीने सुरू आहे. याउलट राज्य सरकारची गती मात्र अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.
परतूरहून लातूरला रेल्वेने पाणी देण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली होती. १५ दिवसांत रेल्वेने पाणी दिले जाईल, असे त्यांनी २० दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. परतूरहून लातूरला पाणी पुरवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे पाठवून दिली. मात्र, तिला आता औरंगाबाद स्थानकावरच ठेवण्यात आले आहे. पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांनी परतूर येथील पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी आणखी १० दिवस लागतील. रेल्वे मिरजेला पाठवली जाणार असून तेथून रोज दोन रेल्वे लातूरला पाठवल्या जाणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
मिरजेच्या रेल्वे विभागाला मात्र या बाबत कोणतीही कल्पना नाही. पाण्याची रेल्वे सोमवारी औरंगाबाद स्थानकातच होती. ती कोठे पाठवायची, या संबंधी अजून कोणतेच आदेश आले नसल्याचे औरंगाबाद रेल्वेस्थानक प्रमुखांनी सांगितले. १२ एप्रिलपासून लातूरला मिरजेहून पाणी दररोज येत आहे. २० एप्रिलपासून रोज २५ लाख लिटर पाण्याची रेल्वे लातूरला येत असून आतापर्यंत ५ कोटी ४५ लाख लिटर पाणी रेल्वेने पाठवले. मिरज येथे दररोज २५ लाख लिटर पाणी भरण्याची सुविधा आहे. रेल्वे मिरजेला पाठवली तर तेथे अतिरिक्त पाणी भरण्याची यंत्रणा अजून अस्तित्वात नाही. लातूरला पाणी पुरवण्याबाबत रेल्वे प्रशासनाचा कारभार अतिशय शिस्तीचा आहे. मात्र, राज्य सरकारमधील मंडळी रेल्वेच्या गतीने आपले काम करू शकत नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत.
परतूर येथील रेल्वेने पाणी देण्यास उशीर लागत असेल, तर पाणीपुरवठा विभागाने त्याची माहिती रेल्वे विभागाला का दिली नाही? रेल्वे औरंगाबाद स्थानकापर्यंत येऊन थांबली आहे, त्यास जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
लातूर जिल्हय़ातील उदगीरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा होती. या बाबत रेल्वे मंत्रालयाकडून अडचण नाही तर राज्य सरकारकडूनच योग्य ते नियोजन होत नाही. याच्या नियोजनास वेळ लागत असल्याने पाणी उपलब्ध असूनही लोकांपर्यंत पोहोचवण्यात अडचणी निर्माण होत आहेत.