मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सहन करणाऱ्या पिंपरी गावामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधलेला सिमेंट नालाबांध मागील चार दिवस झालेल्या पावसामुळे ओसंडून वाहत आहे.
या सततच्या टंचाईग्रस्त गावात दरवर्षी पाण्याची स्थिती सर्वात लवकर व भीषण स्वरूप धारण करीत असे. या वर्षी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विशेष लक्ष घालून लघु सिंचन विभागाला सूचना देऊन गावालगत सिमेंट नालाबांध क्र. तीनचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. पावसाळ्यात नाही, परंतु मागील चार दिवसांत झालेल्या हस्ताच्या पावसात या नालाबांधामध्ये जवळपास दोन फूट उंचीने पाणी साठले. हा पाणीसाठा पाहून शेतकऱ्यांचे चेहरे समाधानाने उजळले. पाण्याची शाश्वती निर्माण झाल्याने जनावरांची पाण्यासाठी होणारी भटकंतीही थांबली आहे. एक किलोमीटर परिसरातील कोरडय़ाठाक पडलेल्या विहिरींमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. या विहिरीतील व बंधाऱ्यातील पाण्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा पिके घेण्याची शाश्वती झाल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. या पाण्यामुळे सणासुदीच्या काळात घराची साफसफाई सुलभ होणार असल्याची भावना महिलांमधून व्यक्त होत आहे.
पिंपरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधमध्ये साठलेल्या पाण्याचे पूजन कार्यकारी अभियंता एस. एस. देशमुख यांनी केले. शाखा अभियंता एम. आर. सस्ते, नाईकवाडी व शेतकरी बाबू भुसनार, नामदेव चव्हाण, राजकुमार गरड, विश्वनाथ तगारे आदींची उपस्थिती होती.

Story img Loader