पोलीस संरक्षणामुळे जायकवाडीत पाणी सोडण्याचा अडलेला निर्णय रविवारी रात्री अंमलबजावणीत आणला जाईल, असे गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक सी. ए. बिराजदार यांनी सांगितले. रात्री ८ वाजेपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी सोडण्याच्या अनुषंगाने खल सुरू होता. दरम्यान, हा निर्णय आजच अंमलबजावणीत यावा, यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रयत्न केला. त्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांसह सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रात्रीतून पाणी सोडण्याची तंबी दिली. उशिरा रात्री पाणी सोडण्याचा निर्णय होणार असल्याने नदीपात्रात कोणी उतरू नये व अवैध उपसाही करू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिले आहे.
जायकवाडी जलाशयात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील चार धरणसमूहातून १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी घेतला होता. त्या विरोधात नगर व नाशिक जिल्ह्य़ातील साखर कारखान्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने मंडळाने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठीच वापरले जावे, असे आदेशात नमूद केले आहे. रविवारच्या दिवसात पाणी सोडले नाही तर गोदावरी उध्र्व भागातील राजकीय नेते सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील व पाणी सोडण्याचा कालावधी वाढू शकतो, असे लक्षात आल्यानंतर मराठवाडय़ातील नेत्यांनी नाशिक जिल्हाधिकारी व पोलिसांशी संपर्क साधला. थोडय़ा प्रमाणात का असेना बंदोबस्त उपलब्ध झाल्याने रात्रीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळा व भंडारदरा या पात्रांसाठी प्रत्येकी ४ पथके स्थापन करण्यात आली असून या पात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याविषयी कळविण्यात आले आहे. तसेच पाण्याचा उपसा होऊ नये म्हणून वीज तोडण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. दारणा, भंडारदरा व निळवंडे येथे पाणी सोडण्यापूर्वी काही जमाव एकत्रित झाला असल्याचे गोदावरी पाटबंधारे मंडळातील सूत्रांनी सांगितले. मात्र, रविवारच्या रात्री पाणी सोडले जाईल, यावर अधिकारी आणि राजकीय नेते ठाम होते.

Story img Loader