लातूरच्या ऐरणीवर आलेल्या पाणीप्रश्नी सलग दोन दिवस सर्वपक्षीय बठकीचे सोपस्कार पार पडले, मात्र बठकीत नेमके निर्णय काय झाले? त्याची अंमलबजावणी कशी व कधी होणार? याची माहिती लोकांपर्यंत कधी पोहोचणार? हे सांगायला व जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही. पाणीप्रश्नाचा गुंता दिवसेंदिवस वाढतोच आहे. तो सोडवण्यासाठी तोंडदेखले सर्व जण आम्ही एकत्र आहोत, आम्ही पाण्याचे राजकारण करणार नाही, असे म्हणत असले तरी प्रत्येक जण यात राजकारणाची संधी शोधत आहे. नागरिकांना पाणी हवे आहे. किंबहुना ‘पाण्या तुला शोधू कुठे?’ असेच म्हणण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. असे असले, तरी यंत्रणेच्या लेखी अजूनही पाणीप्रश्नासंबंधीचे गांभीर्य दिसत नाही.
लातूरच्या पाणीप्रश्नी सारेच अगतिक झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महापौरांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय, तर पाणीपुरवठा कृती समितीनेही सर्वपक्षीय बठक घेतली. दोन्ही ठिकाणी पाणीप्रश्नावर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यावर तोडगा मात्र निघाला नाही. अवकाळी पावसावर भिस्त ठेवत गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे यंदाही एखादा पाऊस पडेल व प्रश्न मार्गी लागेल, अशी समजूत करून घेऊन सर्वच जण प्रश्नाला भिडण्यात चालढकल करीत होते. मात्र, आता पाणीप्रश्न गळय़ाशी आल्यामुळे एकत्र येण्याला पर्याय नाही, हे लक्षात घेऊन महापौरांनी बठकीचे आयोजन केले. अॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोिवदपूरकर व उदय गवारे यांनी मात्र आधीच बठक घेऊन आपला सवतासुभा मांडला.
अॅड. गोमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीस विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापालिका व जिल्हा प्रशासन पाण्याबाबत ठोस कारवाई करीत नाही. निश्चित पाणी कुठून देणार हे सांगत नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील पाण्याचे उपलब्ध स्रोत पुनरुज्जीवित करावेत, पाणी वितरणासाठी प्रत्येक प्रभागात समित्या नेमाव्यात व नागरिकांना पाणी द्यावे. पाण्याबाबत कोणीच राजकारण करणार नाही. आम्हाला कोणाला दोषही द्यायचा नाही, अशी भूमिका बठकीत मांडण्यात आली, मात्र महापौरांनी बोलावलेल्या बठकीस उपस्थित राहण्याचे सौजन्य या मंडळींनी दाखवले नाही.
महापौरांनी बोलावलेल्या बठकीस सर्वपक्षीय मंडळींची हजेरी लावली. व्यापारी महासंघ, रोटरी, लायन्स पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते. सुमारे साडेचार तास पाणीप्रश्नावर विचारमंथन करण्यात आले. पाणीबचत, नळाला मीटर बसवणे, कायमस्वरूपी पाणीप्रश्नावर तोडगा काढणे, त्यासाठी उजनीचे पाणी हाच पर्याय आहे. तात्पुरत्या पाणीटंचाईवर उपाय शोधण्यासाठी भंडारवाडी, माकणी, डोंगरगाव आदी पाणीसाठय़ाचा उपयोग करावा. मनपाच्या िवधनविहिरींचा उपयोग पाणी वितरणासाठी करावा. जुन्या विहिरीतील गाळ काढावा. पाण्याचा तुटवडा असल्यामुळे पाणी टँकरने द्यावे लागणार असले तरी कमी वेळ पाणी दिले तरी चालेल, मात्र ते नळाद्वारेच द्यावे म्हणजे समन्यायी वाटप होईल. टँकरने पाणीपुरवठा करायचा असेल तर प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी उपलब्ध करावे. पाणीटंचाईची संधी साधत खासगी टँकरवाले चढय़ा भावाने पाणी विकत आहेत, त्यावर नियंत्रण आणावे, पाणी वितरणात भांडणे होऊ नयेत, यासाठी प्रभागनिहाय जलमित्र समिती नियुक्त करावी, त्यात पोलिसांचा प्रतिनिधीही असावा अशा विविध सूचना करण्यात आल्या.
महापालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी प्रशासनाने पाण्याचे नेमके नियोजन काय केले, याची माहिती प्रास्ताविकात दिली. आमदार अमित देशमुख यांनी लातूरकरांनी पाण्याच्या बाबतीत दबाव गट निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. राजकारणविरहित लातूरकर म्हणून एकत्र आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महापौर अख्तर शेख यांनी जोरदार टोलेबाजी करीत प्रशासन लातूरकरांना कसे खेळवत आहे, हे सांगताना भीडभाड ठेवली नाही. पाणीप्रश्नावर महापालिकेतील मंडळी काही करीत नाहीत याबद्दल जनतेत रोष आहे, मात्र आम्ही निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार प्रशासनाला असल्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. पसे असूनही प्रशासकीय मंडळी महिनो न् महिने निर्णय करीत नाहीत याची अनेक उदाहरणे त्यांनी आयुक्तांच्या साक्षीने सांगितली.
महापौरांनी आपली बाजू मांडली खरी, पण आता जनतेने करायचे काय? आपले प्रश्न कुठे मांडायचे? महापालिकेत लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा समन्वय नाही. त्याचा त्रास जनतेने का सहन करायचा? पाण्याची गळती होते, पालिकेकडे निधी उपलब्ध आहे, मात्र उपाययोजनांवर अंमलबजावणी होत नाही, यासाठी कोणी कोणाला जाब विचारायचा? प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणूनच लोकप्रतिनिधीची व्यवस्था आहे. आता लोकप्रतिनिधीच आमचे प्रशासन ऐकत नाही असे सांगत असतील तर लोकांनी हातात काय घेऊन जाब विचारावा? लातूरच्या आजूबाजूला असलेले तुटपुंजे पाणी कसेबसे उपलब्ध करता येईल. ते नेमके लोकांना कसे उपलब्ध केले जाईल, हे आताच सांगता येणार नाही. किती दिवसांनी पाणी मिळेल, किती पाणी मिळेल? याबाबतही ठोस माहिती देण्यात आली नाही. पाण्यावर मंथन झाले, मात्र आपापसातील तणतणीमुळे दुरावा वाढतो आहे.
लातूरकरांचा रोकडा सवाल- ‘पाण्या शोधू कुठे तुला?’
लातूरच्या पाणीप्रश्नी सलग दोन दिवस सर्वपक्षीय बठकीचे सोपस्कार पार पडले, मात्र बठकीत नेमके निर्णय काय झाले? त्याची अंमलबजावणी कशी व कधी होणार?
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-01-2016 at 01:36 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem two days meeting